Search This Blog

Thursday, November 18, 2021

113 नगरपंचायतींसाठी 23 नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या

राज्यातील 113 नगरपंचायतींसाठी
23 नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या

मुंबई, दि. 18 (रानिआ): राज्यभरातील 113 नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, 30 नोव्हेंबर 2021 रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

श्री. मदान यांनी सांगितले की, एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या 88, डिसेंबर 2021 मध्ये मुदत समाप्त होणाऱ्या 18 आणि 7 नवनिर्मित अशा एकूण 113 नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी हा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 1 नोव्हेंबर 2021 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 23 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. 29 नोव्हेंबर 2021 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 30 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.

प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणाऱ्या नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी: ठाणे- मुरबाड व शहापूर, पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा, रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित), रत्नागिरी- मंडणगड, दापोली, सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, देवगड- जामसंडे, पुणे- देहू (नवनिर्मित), माळेगांव (ब्रुद्रुक) (नवनिर्मित), सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी, सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ, सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित), नाशिक- निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, धुळे- साक्री, नंदुरबार- धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ, अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी, जळगाव- बोदवड, औरंगाबाद- सोयगाव, जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित), परभणी- पालम, बीड- केज, शिरूर- कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी, लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ, उस्मानाबाद- वाशी, लोहारा बु., नांदेड- हिमायतनगर, नायगाव, अर्धापूर, माहूर, हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ, अमरावती- भातकुली, तिवसा, धारणी, नांदगाव-खंडेश्वर, बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा, यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी, वाशीम- मानोरा, मालेगाव, नागपूर- हिंगणा, कुही, भिवापूर, वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर, भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर, गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, गोरेगाव, देवरी, चंद्रपूर- सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही, गडचिरोली- मुलचेरा, एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड. एकूण- 113. 

Tuesday, November 9, 2021

भंडारा व गोंदिया जि. प.साठी 12 नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या

भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांसाठी
12 नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या 

मुंबई, दि. 10 (रानिआ): भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा; तसेच त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 17 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 1 नोव्हेंबर 2021 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय (निवडणूक विभाग व निर्वाचक गण) विभाजित केल्यानंतर 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 17 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 24 नोव्हेंबर 2021 रोजी निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 26 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गणाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.

12 नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या

महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी
12 नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या
            मुंबई, दि. 9 (रानिआ): विविध सहा महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
            श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 1 नोव्हेंबर 2021 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या पोटनिवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 12 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 16 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 17 नोव्हेंबर 2021 रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 22 नोव्हेंबर 2021 रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर 23 नोव्हेंबर 2021 रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.
            प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.
        विविध महानगरपालिकानिहाय रिक्त पदे अशी: धुळे- 5ब,  अहमदनगर- 9क, नांदेड वाघाळा- 13अ, मीरा भाईंदर- 10ड आणि 22अ, सांगली मिरज कुपवाड- 16अ आणि  पनवेल- 15ड.

Tuesday, November 2, 2021

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार नोंदणी

महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदांच्या
निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी आताच नाव नोंदणी करावी
                                      -राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई, दि. 2 (रानिआ): आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणीही मतदानापासून किंवा उमेदवारीपासून वंचित राहू नये म्हणून भारत निवडणूक आयोगातर्फे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून नावे नोंदवावित किंवा आवश्यक त्या दुरूस्त्या कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केले आहे.

          श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगातर्फे तयार करण्यात येणारी विधानसभा मतदार संघांच्याच मतदार याद्या महानगरपालिका, नगरपरिषदा/ नगरपंचायती, जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या व ग्रामपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जशाच्या तशा वापरल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करताना नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावांत किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कुठलीच कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. त्यामुळे विधानसभेच्या मतदार यादीत नाव नसल्यास नावांची नोंदणी करणे, दुबार नावे वगळणे किंवा नावांतील अथवा पत्यांमधील दुरूस्त्या करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण ही एक चांगली संधी आहे.

          मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असली तरी 1 नोव्हेंबरपासून ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी 1 जानेवारी 2022 हा अर्हता दिनांक आहे. म्हणजे 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण करणारी व्यक्ती आता मतदार म्हणून आपले नाव नोंदवू शकते. मतदार नोंदणीसाठी फक्त निवासाचा आणि वयाचा दाखला; तसेच स्वत:चे छायाचित्र आवश्यक असते. राज्यात राज्य निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या सहकार्यातून व समन्वयाद्वारे व्यापक प्रमाणावर मदतार नोंदणी मोहीम राबविली जात आहे, अशी माहितीही श्री. मदान यांनी दिली.

मतदार नोंदणी (संक्षिप्त पुनरीक्षण) कार्यक्रम

·        प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी: 1 नोव्हेंबर 2021

·        प्रारूप मतदार याद्यांवर दावे व हरकती दाखल करणे: 30 नोव्हेंबर 2021

·        दावे व हरकती निकाली काढणे: 20 डिसेंबर 2021 पर्यंत

·        अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी: 5 जानेवारी 2022

आपण हे करू शकतो

·        विधानसभेच्या प्रारूप मतदार यादीतून आपल्या नावाची खात्री करणे

·        1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण करणारी व्यक्ती नाव नोंदवू शकते

·        आपल्या संबंधित मतदार याद्यांतील दुबार/ समान नोंदीदेखील वगळता येतील

·        आवश्यक असल्यास पत्त्यात अथवा नावांत दुरूस्त्याही करता येतील

·        एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाला असल्यास पत्यात बदल करावा

·        आपल्या कुटुंबातील मृत व्यक्तीचे नाव वगळावे

·        नाव नोंदविल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान करू शकाल

नाव नोंदणी कुठे कराल?  

·        ऑनलाईन नाव नोंदणीसाठी- www.nvsp.in

·        छापील अर्जाद्वारे नाव नोंदणी- मतदान केंद्र किंवा अन्य निर्देशित ठिकाणे

नाव नोंदणीसाठीच्या अर्जाचे नमुने

·        प्रथम नाव नोंदणीसाठी किंवा दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतर केले असल्यास: अर्ज क्र. 6

·        अनिवासी मतदाराचे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी: अर्ज क्र. 6अ

·       इतर नावांबाबत आक्षेपासाठी किंवा मृत व्यक्तीचे नाव वगळण्यासाठी: अर्ज क्र. 7

·        मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरूस्त्या करण्यासाठी: अर्ज क्र. 8

·        एकाच मतदारसंघातील निवासाचे ठिकाण बदलले असल्यास: अर्ज क्र. 8अ

निवासाचा दाखला (कोणताही एक)

·        जन्म दाखला

·        भारतीय पारपत्र

·        वाहन चालक परवाना

·        बँक/ किसान/ पोस्ट पासबूक

·        सिधावाटप पत्रिका

·        प्राप्तिकर निर्देशपत्रिका

·        पाणी/ दूरध्वनी/ वीज/ गॅस देयक

·        टपाल खात्याद्वारे प्राप्त टपाल/ पत्र

वयाचा दाखला (कोणताही एक)

·        भारतीय पारपत्र

·        वाहन चालक परवाना

·        पॅन कार्ड

·        शाळा सोडल्याचा दाखला

·        12 वी, 10 वी, 8 वी किंवा 5 वीची गुणपत्रिका

·        आधार कार्ड

·        21 वयोगटावरील प्रथमच नोंदणी करणाऱ्यांसाठी जोडपत्र-3

ऑनलाईन नाव नोंदणीसाठी

·        कागदपत्रे व छायाचित्र दोन एमबीच्या आत असावेत

·        कागदपत्रांची व छायाचित्राची फाईल JPG/ JPEG असावी


Tuesday, October 5, 2021

पोटनिवडणुकांसाठी 63 टक्के मतदान

                  जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 63 टक्के मतदान

मुंबई, दि. 5 (रानिआ): धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या 6 जिल्हा परिषदांतील 84; तर त्यांतर्गतच्या 38 पंचायत समित्यांतील 141 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी आज प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 63 टक्के मतदान झाले.
        सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या 6 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 38 पंचायत समित्यांतील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या 6 जिल्हा परिषदेच्या 85 निवडणूक विभागांची आणि पंचायत समित्यांच्या 144 निर्वाचक गणांतील जागा रिक्त झाल्या होत्या. त्यापैकी धुळे जिल्हा परिषदेच्या एका आणि शिरपूर (जि. धुळे) पंचायत समितीच्या दोन; तर अक्कलकुवा (जि. नंदुरबार) पंचायत समितीच्या एका जागेवरची पोटनिवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित जागांसाठी आज मतदान झाले. सर्व ठिकाणी उद्या (ता.6) सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल.
       प्राथमिक माहितीनुसार जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी अशी: धुळे- 60,  नंदुरबार- 65, अकोला- 63, वाशीम- 65, नागपूर- 60 आणि पालघर- 65. एकूण सरासरी- 63.

Tuesday, September 28, 2021

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने
मतदार यादीत नावे नोंदविण्याची व दुरुस्तीची संधी
                                   -राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि. 28 (रानिआ): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत पात्र नागरिकांना मतदार यादीत नावे नोंदविण्याची आणि मृत, दुबार अथवा स्थलांतरीतांची नावे वगळण्याची चांगली संधी आहे. त्याबाबत विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांनी समन्वयाने व्यापक व प्रभावी जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिले.
        भारत निवडणूक आयोगातर्फे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मतदार जागृती अभियानाच्या तयारीबाबत श्री. मदान यांनी आज जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ काँफरन्सिंग) संवाद साधला. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील स्वीप सल्लागार दिलीप शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
         श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगातर्फे तयार करण्यात येणारी विधानसभा मतदारसंघांचीच मतदार यादी महानगरपालिका, नगरपरिषदा/ नगरपंचायती, जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या व ग्रामपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. त्यामुळे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या कालावधीत 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून आपली नावे नोंदवावित. त्याचबरोबर मृत, दुबार/ समान नोंदीदेखील वगळता येतील. आवश्यक असल्यास पत्त्यात अथवा नावांत दुरूस्त्याही करता येतील. या कार्यक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. त्याकरिता मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाबरोबरच विविध कल्पक बाबींचाही अवलंब करावा.
        श्री. देशपांडे यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याच्या दृष्टीने आताच मतदार म्हणून आपले नाव नोंदविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मतदार यादी अद्ययावत आणि अधिकाधिक बिनचूक करण्यासाठीदेखील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नावांमध्ये दुरूस्त्या असल्यास त्याही कराव्यात. मृतांची अथवा दुबार नावे वगळावयाची असल्यास नमुना क्रमांक 7 भरून तो संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा संबंधित ठिकाणी जमा करावा अथवा ऑनलाईन पद्धतीने www.nvsp.in या संकेतस्थळावर भरावा. या संकेतस्थळावर नवीन मतदार म्हणूनदेखील नाव नोंदणी करता येते.
        श्री. कुरुंदकर यांनी सांगितले की, आगामी काळात मोठ्याप्रमाणावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी मतदार म्हणून नावे नोंदविण्याची किंवा मतदार यादीत दुरूस्त्या करण्याची ही शेवटची संधी आहे. याबाबत नागरिकांना व मतदारांना अवगत करणे आवश्यक आहे; तसेच ही सर्व प्रक्रिया अधिकाधिक सुलभ केल्यास नागरिकांचा चांगला प्रतिसादही लाभेल. त्यादृष्टीने सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिकेच्या यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करावे. 




Thursday, September 23, 2021

निवडणुकांसाठी जातवैधता प्रमाणपत्र

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी
 जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घ्यावे
                    -राज्य निवडणूक आयुक्त
             मुंबई, दि. 23 (रानिआ): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुका राखीव जागांवर लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी जात प्रमाणपत्रासह जातवैधता प्रमाणपत्र वेळीच प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधितांनी आतापासूनच वैयक्तिक स्तरावर पूर्तता करावी, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केले आहे.
            श्री. मदान यांनी सांगितले की, राज्यभरातील महानगरपालिका, नगरपरिषदा/ नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समिती व ग्रामपंचायती या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काळात मोठ्याप्रमाणावर निवडणुका होणार आहेत. संबधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगवेगळ्या कायद्यानुसार राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. त्यासाठी इच्छूक उमेदवारांनी प्रथमत: जात प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. त्यानंतर जातवैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसह जात पडताळणी समितीकडे अर्ज करावा. त्यादृष्टीने आतापासूनच संबंधितांनी तयारी करणे आवश्यक आहे. जेणे करून नामनिर्देशनपत्र सादर करताना ऐनवेळी कोणाचीही धावपळ होणार नाही आणि एकही इच्छूक उमेदवार जातवैधता प्रमाणपत्राअभावी निवडणूक लढविण्यापासून वंचित राहणार नाही.

Monday, September 13, 2021

जि.प.,पं स. पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान

मुंबई, दि. 13 (रानिआ): धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे; तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

श्री. मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु सर्वोच्च न्यायालयाचे 6 जुलै 2021 रोजीचे आदेश आणि राज्य शासनाने कोविड-19 मुळे पोटनिवडणुका स्थगित करण्याबाबत केलेली विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका 9 जुलै 2021 रोजी  आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या होत्या. या प्रकरणी 9 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या सुनावणीत मात्र सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचे 11 ऑगस्ट 2021 रोजीचे कोविड-19 संदर्भातील निर्बंध पोटनिवडणुकांसाठी लागू होत नसल्याचा निर्णय दिला आहे; तसेच पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पुढे चालू ठेवण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने तात्काळ निर्णय घेण्याबाबतही आदेश दिले आहेत. हे आदेश आणि कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेवून राज्य निवडणूक आयोगाने आता पोटनिवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरसह पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोना रुग्णांची संख्या व आठवडाभरातील दैनंदिन व मृतांच्या संख्येबाबत अहवाल मागविला होता. त्यावरून या सहा जिल्ह्यांतील कोरोना परिस्थिती आटोक्यात असल्याचे दिसून आले. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरच्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 22 जून 2021 रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमात पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. कारण त्यावेळी कोविड-19 संदर्भातील राज्य शासनाच्या निकषानुसार पालघर जिल्ह्याचा समावेश स्तर-3 मध्ये होता. त्यामुळे तेथील पोटनिवडणुका जाहीर केलेल्या नव्हत्या. आता मात्र या सर्व निवडणुकांची  प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. 21 सप्टेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. पुढील टप्पे धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरच्या जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसोबत होतील. कारण या पाच जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम छाननीनंतर स्थगित करण्यात आला होता. आता पालघरसह सर्व ठिकाणी 21 सप्टेंबर 2021 रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. नामनिर्देशनपत्रासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 27 सप्टेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी 29 सप्टेंबर 2021 पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान; तर 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदेच्या एकूण 85 निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या एकूण 144 निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होईल. त्यासाठी कोरोना संदर्भातील आवश्यक ते सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजून दक्षता घेण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले असल्याचे श्री. मदान यांनी सांगितले.


Friday, July 9, 2021

पोटनिवडणुका स्थगित

                               जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

मुंबई, दि. 09 (रानिआ): कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरलेली नसतांनाच तिसऱ्या लाटेची आणि ‘डेल्टा प्लस’चा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची भीती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील 5 जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
    श्री. मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदांमधील 70 निवडणूक विभाग आणि 33 पंचायत समित्यांमधील 130 निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु 7 जुलै 2021 रोजी राज्य शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.
    सर्वोच्च न्यायालयाचे 6 जुलै 2021 रोजीचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडून कोविड-19 बाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते. त्याआधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथिल करण्यात आली आहे. कोविड-19 ची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असेही श्री. मदान यांनी सांगितले.