Search This Blog

Thursday, March 7, 2019

निवडणूक खर्चासंदर्भात राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाची नोटीस


निवडणूक खर्चासंदर्भात राजकीय पक्षांना
राज्य निवडणूक आयोगाची नोटीस
मुंबई, दि. 7 (रा.नि.आ.): राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केलेल्या खर्चाचा तपशील सादर न केल्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने मान्यताप्राप्त 14 राजकीय पक्षांना नोटीस बजावल्या असून 10 मार्च 2019 पर्यंत खर्चाचा तपशील सादर करावा, असे कळविण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाच्या 15 ऑक्टोबर 2016 च्या आदेशान्वये राजकीय पक्षांना निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासंदर्भात वेगवेगळ्या माध्यमातून राजकीय पक्षांना वेळोवेळी अवगतही करण्यात आले होते. त्यामुळे आपली नोंदणी रदद् का करण्यात येऊ नये, अशी नोटीस आता बजावण्यात आली आहे.
नोटीस बजावण्यात आलेल्या राजकीय पक्षांनी नावे अशी: भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पार्टी, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), बहुजन समाज पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनता दल (सेक्युलर), समाजवादी पार्टी, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम, लोकजनशक्ती पार्टी, ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन आणि जनता दल (युनायटेड).
०-०-०

Thursday, February 21, 2019

पालघर, सिंदखेडराजा व लोणार नगरपरिषदेसाठी 24 मार्चला मतदान


पालघर, सिंदखेडराजा व लोणार नगरपरिषदेसाठी
24 मार्चला मतदान
मुंबई, दि. 21 (रा.नि.आ.): पालघर (जि. पालघर), सिंदखेडराजा आणि लोणार (जि. बुलढाणा) या तीन नगरपरिषदेच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 मार्च 2019 रोजी मतदान होणार असून त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, पालघर, सिंदखेडराजा व लोणार या नगरपरिषदांच्या मुदती एप्रिल 2019 मध्ये संपत आहेत. या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 28 फेब्रुवारी ते 7 मार्च 2019 या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जातील. 3 व 4 मार्च 2019 या शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देनपत्रांची छाननी 8 मार्च 2019 रोजी होईल. मतदान 24 मार्च 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत होईल. मतमोजणी 25 मार्च 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

557 ग्रामपंचायतींसाठी 24 मार्च रोजी मतदान


 557 ग्रामपंचायतींसाठी
24 मार्च रोजी मतदान
सरपंचपदांच्या 82 रिक्त जागांसाठीही मतदान
मुंबई, दि. 21 (रा.नि.आ.): राज्यातील विविध 24 जिल्ह्यांमधील 557 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच 82 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागासांठी 24 मार्च 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, एप्रिल 2019 ते जून 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांबरोबरच थेट सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान होईल. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 5 ते 9 मार्च 2019 या कालावधीत स्वीकारले जातील. त्यांची छाननी 11 मार्च 2019 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 13 मार्च 2019 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 24 मार्च 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 25 मार्च 2019 रोजी होईल.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 3, रायगड- 20, रत्नागिरी- 11, सिंधुदुर्ग- 4, नाशिक- 48, धुळे- 18, जळगाव- 12, अहमदगनर- 3, नंदुरबार- 5, पुणे- 20, सोलापूर- 8, सातारा- 44, कोल्हापूर- 3, औरंगाबाद- 3, उस्मानाबाद- 2, परभणी- 1, अमरावती- 1, अकोला- 14, वाशीम- 32, बुलडाणा- 2, नागपूर- 2, वर्धा- 298, चंद्रपूर- 1 आणि गडचिरोली- 2. एकूण- 557.
पोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा: ठाणे- 1, रायगड- 15, सिंधुदुर्ग- 3, नाशिक- 4, धुळे- 1, जळगाव- 2, अहमदगनर- 4, नंदुरबार- 1, पुणे- 3, सोलापूर- 3, सातारा- 6, सांगली- 2, कोल्हापूर- 8, बीड- 1, नांदेड- 6, उस्मानाबाद- 2, परभणी- 2, अकोला- 3, यवतमाळ- 1, वाशीम- 6, बुलडाणा- 2, नागपूर- 6. एकूण- 82.
०-०-०
(Jagdish More, PRO, SEC)

Thursday, January 31, 2019

सिल्लोड नगरपरिषदेसाठी 27 फेब्रुवारीला मतदान


सिल्लोड नगरपरिषदेसाठी
27 फेब्रुवारीला मतदान
मुंबई, दि. 31 (रा.नि.आ.): सिल्लोड (जि. औरंगाबाद) नगरपरिषदेच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 27 फेबुवारी 2019 रोजी मतदान होणार असून त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, 5 ते 12 फेब्रुवारी 2019 या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जातील. 9 व 10 फेब्रुवारी 2019 या शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देनपत्रांची छाननी 13 फेब्रुवारी 2019 रोजी होईल. मतदान 27 फेबुवारी 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत होईल. मतमोजणी 28 फेबुवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

Thursday, December 27, 2018

पाच नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 27 जानेवारी 2019 रोजी मतदान


पाच नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी
27 जानेवारी 2019 रोजी मतदान
मुंबई, दि. 27 (रा.नि.आ.): कर्जत (जि. रायगड), मलकापूर (जि. सातारा), श्रीगोंदा (जि. अहमदनगर), आरमोरी (जि. गडचिरोली) या नगरपरिषदा व महादुला (जि. नागपूर) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 11 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 जानेवारी 2019 रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, 2 ते 9 जानेवारी 2019 या कालावधीत नामनिर्देनपत्र स्वीकारली जातील. नामनिर्देनपत्रांची 10 जानेवारी 2019 रोजी छाननी होईल. मतदान 27 जानेवारी 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत होईल. मतमोजणी 28 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.
पोटनिवडणूक होत असलेली नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय जागा अशी: राजापूर (जि.रत्नागिरी)- 6अ, आळंदी (पुणे)- 9अ, फलटण (सातारा)- 12अ, दुधनी (सोालापूर)- 2ब, पन्हाळा (कोल्हापूर)- 8क, दिंडोरी (नाशिक)- 15, यावल (जळगाव)- 1अ, बीड- 11अ, बुलढाणा- 12ब, अर्जुनी (गोंदिया)- 14, गोरेगाव (गोंदिया)- 14.

Sunday, December 9, 2018

विविध 6 नगरपरिषदांसाठी सरासरी 74.12 टक्के मतदान


विविध 6 नगरपरिषदा/ नगरपंचायतींसाठी
सरासरी 74.12 टक्के मतदानाचा अंदाज
मुंबई, दि. 9 (रानिआ): राज्यातील विविध सहा नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सरासरी 74.12 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, सहापैकी मौदा आणि शेंदुर्णी या दोन नगरपंचायती आहेत. उर्वरित सर्व नगरपरिषदा आहेत. सर्व ठिकाणी आज सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. मतमोजणी उद्या (ता. 10) रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
          नगरपरिषद/नगरपंचायत निहाय सरासरी मतदान: नेर- नबाबपूर (जि. यवतमाळ)- 73.15, लोहा (नांदेड)- 86.75,  मौदा (नागपूर)- 77.56, रिसोड (वाशीम)- 68.07,  ब्रम्हपुरी (चंद्रपूर)- 70.52, आणि शेंदुर्णी (जळगाव)- 74.19, एकूण सरासरी- 74.12.

धुळ्यात 60, तर अहमदनगरमध्ये 67 टक्के मतदान


महानगरपालिका निवडणूक 2018
धुळ्यात 60, तर अहमदनगरमध्ये 67 टक्के मतदान
मुंबई, दि. 9 (रानिआ): धुळे व अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुक्रमे सरासरी 60 आणि 67 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
          श्री. सहारिया यांनी सांगितले की, धुळे महानगरपालिकेच्या 19 प्रभागातील एकूण 73 जागांसाठी हे मतदान झाले. एका जागेची निवडणूक बिनविरोध झाली असून एकूण 74 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 5, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 20 जागा राखीव होत्या. अहमदनगर महानगरपालिकेच्या 17 प्रभागातील एकूण 68 जागांसाठी मतदान झाले. अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 18 जागा राखीव आहेत. मतमोजणी उद्या (ता. 10) रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.