अटींची पूर्तता करणाऱ्या अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी
तात्पूरत्या
आरक्षित चिन्हासाठी त्वरित अर्ज करणे आवश्यक
मुंबई,
दि. 13 (रानिआ): राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या आणि
विशिष्ट अटींची पूर्तता करणाऱ्या नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षास जिल्हा
परिषदेच्या निवडणुकीत तात्पुरत्या स्वरुपात निवडणूक चिन्ह आरक्षित करून हवे
असल्यास 15 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करणे आश्यक आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने
स्पष्ट केले आहे.
संबंधित
अटींची पूर्तता करणाऱ्या नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षाला तात्पुरत्या स्वरुपात
चिन्ह आरक्षित करून हवे असल्यास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर
झाल्यानंतर लगेच आणि नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात
होण्यापूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या 3 दिवस आधी
महानगरपालिका निवडणुकांसाठी महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेसह अन्य स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणे अनिवार्य असते.
त्या अर्जावर नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात होण्याच्या 1 दिवस आधी जिल्हाधिकारी
किंवा महानगरपालिका आयुक्त निर्णय घेतात.
जिल्हा
परिषदेच्या आज जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार दोन दिवसांतच 16 जानेवारी
2026 पासून नामनिर्देनपत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे एखाद्या
जिल्हा परिषदेच्या (पंचायत समिती वगळून) गेल्या निवडणुकीत एखाद्या नोंदणीकृत
अमान्यताप्राप्त राजकीय पक्षाने संबंधित अटींची पूर्ता केली असल्यास अशा पक्षाला 15 जानेवारी 2026 पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल. त्यावर
संबंधित जिल्हाधिकारी 16 जानेवारी 2026 पर्यंत निर्णय घेतील
व आपला निर्णय तात्काळ संबंधित नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षाला आणि सर्व
संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळवतील. संबंधित नोंदणीकृत अमान्यताप्राप्त
राजकीय पक्षाला ते चिन्हे संबंधित जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपुरतेच आरक्षित असेल.