Search This Blog

Thursday, June 16, 2022

महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची 23 जूनला प्रसिद्धी

 

महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची 23 जूनला प्रसिद्धी

मुंबई, दि. 16 (रानिआ): बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.

राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 जून 2022 रोजी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 17 जून 2022 रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार होत्या; परंतु आता सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार याद्या 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 9 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात.