Search This Blog

Monday, August 26, 2019

कॉफी टेबल बूकचे प्रकाशन

मुंबई येथे राजभवनात सोमवारी (ता. 26) राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते राज्य निवडणूक आयोगाच्या ‘ट्वेंटी फाइऊ ईयर्स ऑफ स्टेट इलेक्शन कमिशन महाराष्ट्र’ कॉफी टेबल बूकचे प्रकाशन झाले. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया, राज्यपालांचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्‌डी, आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर, राज्यपालाचे उपसचिव रणजित कुमार आदी यावेळी उपस्थित होते.

राज्य निवडणूक आयोगाच्या कॉफी टेबल बूकचे प्रकाशन
खेड्यांच्या विकासातून देशाच्या विकासाला हातभार लाभेल: राज्यपाल
मुंबई, दि. 26 (रा.नि.आ.): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीचा पाया अधिकाधिक मजबूत करून खेड्यांचा विकास झाल्यास आपोआप देशाच्या विकासाला हातभार लाभेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.
राज्य निवडणूक आयोगाच्या ‘ट्वेंटी फाइव्ह इयर्स ऑफ स्टेट इलेक्शन कमिशन महाराष्ट्र’ या पुस्तकाचे (कॉफी टेबल बूक) राज्यपालांच्या हस्ते राजभवनात प्रकाशन झाले, त्यावेळी ते बोलत होते. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया, राज्यपालांचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्‌डी, आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर, राज्यपालाचे उपसचिव रणजित कुमार आदींसह राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाने लोकशाहीचा पाया मजबूत करण्यात निश्चितच मोलाचे योगदान दिले आहे. निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करून त्यासंदर्भातील माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याच्यादृष्टीने कॉफी टेबल बूकसारखे उपक्रम उपयुक्त ठरू शकतात.
श्री. सहारिया म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिकाधिक मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने विविध निवडणूक सुधारणा अंमलात आणल्या आहेत. या पुस्तकात त्याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा घेतला आहे.
श्री. कुरूंदकर यांनी कॉफी टेबल बूकच्या प्रकाशनासंदर्भातील भूमिका निश्चित केली. त्यांनी आभार प्रदर्शनही केले. आयोगाचे सहायक आयुक्त (जनसंपर्क) जगदीश मोरे यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.