राज्य निवडणूक आयोगातर्फे
आजपासून आंतरराष्ट्रीय परिषद
मुंबई, दि. 24 (रा.नि.आ.): भारतीय संविधानातील 73 आणि 74 व्या
दुरुस्तीच्या रौप्य महोत्सवानिमित्त राज्य निवडणूक आयोगातर्फे उद्या (ता. 25) पासून
मुंबई येथे ‘सुदृढ लोकशाहीसाठी निकोप निवडणुका’ या विषयावर दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय
परिषद होत आहे.
राज्यपाल सी. विद्यासागर राव
यांच्या हस्ते 25 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 9.30 वाजता परिषदेचे उद्घाटन होईल.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे
पाटील प्रमुख पाहुणे असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 26
ऑक्टोबर 2018 रोजी दुपारी 2.30 वाजता समारोप समारंभ होईल. वित्त व नियोजन मंत्री
सुधीर मुनगंटीवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे प्रमुख पाहुणे
असतील. अंधेरीतील हॉटेल लीलामध्ये ही परिषद होईल. विविध देशांतील आणि राज्यांतील निवडणूक
यंत्रणांचे प्रमुख प्रतिनिधी परिषदेत सहभागी होणार आहेत. दोन दिवस विविध विषयांवर
चर्चा होईल, असे आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविण्यात आले.