राज्य निवडणूक आयोगातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या बोधचिन्हाचे
अनावरण करताना राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया. शेजारी आयोगाचे सचिव शेखर चन्ने.
|
राज्य निवडणूक आयोगातर्फे 25 व 26 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय परिषद
-राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि. 22 (रा.नि.आ.): भारतीय संविधानातील 73 आणि 74 व्या
दुरुस्तीच्या रौप्य महोत्सवानिमित्त राज्य निवडणूक आयोगातर्फे 25 आणि 26 ऑक्टोबर
2018 रोजी मुंबई येथे ‘सुदृढ लोकशाहीसाठी निकोप निवडणुका’ या विषयावर दोन दिवशीय
आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त
ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या
कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आयोगाचे सचिव शेखर चन्ने यावेळी उपस्थित
होते. आंतरराष्ट्रीय परिषदेच्या बोधचिन्हाचेही याप्रसंगी अनावरण करण्यात आले.
त्यानंतर श्री. सहारिया म्हणाले की, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते 25
ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 9.30 वाजता परिषदेचे उद्घाटन होईल. ग्रामविकास मंत्री
पंकजा मुंडे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील प्रमुख पाहुणे
असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 26 ऑक्टोबर 2018 रोजी
दुपारी 2.30 वाजता समारोप समारंभ होईल. वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार
आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे प्रमुख पाहुणे असतील. अंधेरीतील
हॉटेल लीलामध्ये ही परिषद होईल.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने परिषदेत विचारमंथन होईल. विविध
देशांतील आणि राज्यांतील निवडणूक यंत्रणांचे प्रमुख प्रतिनिधी परिषदेत सहभागी
होणार आहेत. ‘जनतेकडील लोकशाहीचे स्वामित्व’, ‘निवडणुकांतील पैशांचा गैरवापर’, ‘वंचित,
उपेक्षित व दुर्बल घटकांचा सहभाग’, ‘खोट्या बातम्या व समाज माध्यमांचा गैरवापर’
आणि ‘हितधारकांची भूमिका’ या पाच विषयांवर चर्चासत्र होतील. त्यात निवडणूक
संदर्भातील विविध विषयांतील जाणकार आपले विचार मांडतील, अशी माहिती त्यांनी दिली.
परिषदेच्या आयोजनासाठी असोसिएशन
फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर), राष्ट्रकूल स्थानिक स्वराज्य संस्था मंच
(सीएलजीएफ), पुणे येथील गोखले राज्यशास्र व अर्थशास्र संस्था, इंटरनॅशनल
इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रसी अँड इलेक्ट्रोल असिस्टन्स (इंटरनॅशनल आयडिया), मुंबई
विद्यापीठ आणि रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेमोक्रसी (आरएससीडी) या संस्थांचे
‘नॉलेज पार्टनर’ म्हणून सहकार्य लाभत आहे. या शिवाय देश- विदेशातील विविध
मान्यवरांचेदेखील सहकार्य लाभले आहे, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.