Search This Blog

Thursday, June 8, 2017

राज्य निवडणूक आयोगाचे नावीन्यपूर्ण उपक्रम


राज्य निवडणूक आयोगाचे नावीन्यपूर्ण उपक्रम
भारत निवडणूक आयोगासाठीदेखील उपयुक्त
                -राज्यपाल सी. विद्यासागर राव

मुंबई, दि. 8: राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राबविलेले नावीन्यपूर्ण उपक्रम भारत निवडणूक आयोगासाठीदेखील उपयुक्त ठरू शकतील, असे गौरवोद्‌गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे काढले.
येथील राजभवनात राज्य निवडणूक आयोगाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांबाबतच्या पुस्तिकेचे आणि मतदार सर्व्हे अहलावलाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. राज्य निवडणूक आयुक्त ज. . सहारिया, राज्यपालांचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, आयोगाचे सचिव शेखर चन्ने, राज्यपालांचे उपसचिव रणजीत कुमार आदी यावेळी उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले की, लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीचे असते. ही प्रक्रिया अधिकाधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न राज्य निवडणूक आयोगाने केला आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोग कौतुकास पात्र ठरतो.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि कारभार या दोन स्वतंत्र बाबी आहेत. 73 आणि 74 व्या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक स्वायतत्ता प्राप्त झाली; परंतु देशभराचा विचार केल्यास या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थांकडे काही विषयांचे हस्तांतरण करून त्यांना अधिक बळकट करण्यास वाव आहे. याचा देखील गांभीर्याने विचार झाला पाहिजे. दिव आणि दमण या केंद्र शासित प्रदेशात यासंदर्भात चांगले काम झाले आहे, असेही राज्यापालांनी सांगितले.
आयोगाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांबाबत सादरीकरण करताना श्री. सहारिया यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक करण्यावर आम्ही भर दिला. त्यासाठी संगणकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला. मतदार, उमेदवार आणि राजकीय पक्षांनीही चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळेच शंभर टक्के नामनिर्देनपत्रे संगणक प्रणालीद्वारे दाखल होऊ शकली. मतदानाच्या प्रमाणातही वाढ झाली. महानगरपालिकेच्या  2012 मधील निवडणुकीत 48.59 टक्के मतदान झाले होते. त्यात आता 2017 मध्ये 56.40 पर्यंत वाढ झाली. नगरपालिकेच्या सन 2011-12 च्या निवडणुकीत 65.16 टक्के मतदान झाले होते.  आता सन 2016- 17 मध्ये 70.00 टक्के मतदान झाले.  जिल्हा परिषदेच्या सन 2012 च्या निवडणुकीत 67.27 टक्के मतदान झाले होते. ते यावेळी 2017 मध्ये 69.02 इतके झाले.

आयोगाचे नावीन्यपूर्ण उपक्रम आणि फलश्रृती
·        संगणकीय प्रणालीद्वारे मतदार याद्यांचे विभाजन
·        संगणकीय प्रणालीद्वारे 10,457 जागांसाठी 1,87,135 नामनिर्देनपत्रे प्राप्त
·        ट्रू व्होटर, कॉप आणि एफएक्यू या मोबाईल ॲप्लिकेशन्सचा वापर
·        ट्रू व्होटर ॲपचा 1 कोटी 4 लाख लोकांडून वापर 
·        सुमारे 90 टक्के उमेदवारांकडून ट्रू व्होटरद्वारे निवडणूक खर्च सादर
·        मिस कॉलद्वारे 10 लोकांडून मतदानाची प्रतिज्ञा
·        मतदार जागृतीसाठी प्रथमच चॅटबॉट तंत्रज्ञानाचा अवलंब
·        व्हर्च्यूअल क्लासरुम आणि कम्युनिटी रेडियोंचा मतदार जागृतीत सहभाग
·        नामवंत उद्योजक, खेळाडू, कलावंतांच्या माध्यमातून मतदारांना साद
·        मुंबई येथील प्रजासत्ताक दिनात प्रथमच आयोगाच चित्ररथ
·        उमेदवारांसंदर्भातील माहितीचे मतदान केंद्राबाहेर फलक व जाहिराती
·        उमेदवारांबाबतच्या माहितेचे स्वयंसेवी संस्थांमार्फत विश्लेषण
·        लोकप्रतिनिधींच्या स्वेच्छा निधी खर्चास तीन महिने आधी प्रतिबंध
·        खर्चाचा वार्षिक हिशेब न देणाऱ्या 220 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द
·        नामवंत संस्थांच्या माध्यमातून निवडणूकविषयक संशोधनाला चालना
·        लोकसहभागातून व्यापक मतदार जागृतीमुळे मतदानाच्या प्रमाणात वाढ