Search This Blog

Tuesday, December 26, 2017

ग्रामपंचायतींसाठी अंदाजे 82 टक्के मतदान

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंदाजे 82 टक्के मतदान
मुंबई, दि. 26: राज्यातील विविध 27 जिल्ह्यांतील जानेवारी-फेब्रुवारी 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 671 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 82 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, या सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान पार पडले. मात्र गडचिरोली व गोंदिया या दोन जिल्ह्यांत केवळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 पर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली असून मतमोजणी 27 डिसेंबर 2017 रोजी होईल.
सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष मतदान झालेल्या जिल्हानिहाय ग्रामपंचायतींची संख्या अशी: ठाणे- 25, पालघर- 36, रायगड- 5, रत्नागिरी- 4 सिंधुदुर्ग- 16, जळगाव- 90 नंदुरबार- 13, अहमदनगर- 66, पुणे- 89, सातारा- 11, सोलापूर- 64, सांगली- 5, कोल्हापूर- 10 औरंगाबाद- 2, बीड- 157, नांदेड- 3, परभणी- 2, उस्मानाबाद- 1, जालना- 1, लातूर- 5, अमरावती- 12, अकोला- 3, वाशीम- 2, बुलडाणा- 41, वर्धा- 2, गोंदिया- 2 आणि गडचिरोली- 4. एकूण- 671. 

Wednesday, December 13, 2017

ठाणे जिल्हा परिषदेसाठी 65 टक्के मतदान

ठाणे जिल्हा परिषदेसाठी 65; तर 10 नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी 73 टक्के मतदान
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एका जागेसाठी 29 टक्के मतदान
मुंबई, दि. 13: ठाणे जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पाच पंचायत समित्यांसाठी 65 तर; 10 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 72.81 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीसाठी 29 टक्के मतदान झाले असून इतर विविध ठिकाणच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील शांततेत मतदान पार पडले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.  
श्री. सहारिया यांनी सांगितले की, ठाणे जिल्हा परिषदेच्या एकूण 52 जागांसाठी मतदान झाले; तसेच त्यांतर्गतच्या शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ या पाच पंचायत समित्यांच्या एकूण 106 जागांसाठीही मतदान झाले. शेलार निवडणूक विभागातील मतदान केंद्र क्र. 38/6 वर फेरमतदान घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. त्यामुळे शेलार निवडणूक विभाग; तसेच शेलार निर्वाचक गण आणि कोलीवली निर्वाचक गणाची मतमोजणी पुढील आदेश होईपर्यंत करण्यात येऊ नये, असे आदेश आयोगाने दिले आहेत.
वाशीम जिल्हा परिषदेच्या पांगरी नवघरे निवडणूक विभागाच्या रिक्त पदासोबतच चाणजे (उरण), माटणे (दोडामार्ग), काथली खु. (नंदुरबार), किल्लारी (औसा), मलकापूर (अकोला) आणि मार्डी (मारेगाव) या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील आज मतदान झाले. या सर्व ठिकाणी उद्या (ता. 14) मतमोजणी होईल.
नगरपरिषदा/ नगरपंचायतींसाठी मतदान
        विविध जिल्ह्यांमधील 6 नगरपरिषदा आणि 4 नगरपंच्यातींच्या सदस्यपदांसाठी आणि अध्यक्षपदासाठी; तसेच पाच नगरपरिषदा व एका नगरपंचायतीतील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील आज मतदान झाले, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.  
             नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेले मतदान असे: हुपरी (जि. कोल्हापूर) 85.18, नंदुरबार- 70.93, नवापूर (जि. नंदुरबार)- 66.34, किनवट (जि. नांदेड)- 77, चिखलदरा (जि. अमरावती)- 80.85, पांढरकवडा (जि. यवतमाळ)- 68.56, वाडा (जि. पालघर)- 72.79, शिंदखेडा (जि. धुळे)- 72.59, फुलंब्री (जि. औरंगाबाद)- 75.14 आणि सालेकसा (जि. गोंदिया)- 89.65. सरासरी- 72.81.
         नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी अशी: मैंदर्गी (जि. सोलापूर)- 71.83, शहादा (जि. नंदुरबार)- 63.50, अंबाजोगाई (जि. बीड)- 78.61, जिंतूर (जि. परभणी)- 64.42, मंगरूळपीर (जि. वाशीम)- 58.62 आणि एटापल्ली (जि. गडचिरोली)- 74.37. वाडा नगरपंचायत व नंदुरबार आणि नवापूर नगरपरिषदेची मतमोजणी 18 डिसेंबर 2017 रोजी होणार आहे. अन्य सर्व ठिकाणीच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांची मतमोजणी उद्या (ता. 14) होईल.
मुंबईत एका जागेसाठी मतदान
               बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.21 च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज 29 टक्के मतदान झाले. या जागेसाठी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. येथे एकूण 32 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. 

Tuesday, December 12, 2017

ठाणे जिल्हा परिषदेसह 10 नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी आज मतदान

ठाणे जिल्हा परिषदेसह 10 नगरपरिषद, नगरपंचायतींसाठी आज मतदान
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एका जागेसाठीदेखील मतदान
मुंबई, दि. 12: ठाणे जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पाच पंचायत समित्या; तसेच 10 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. 13) मतदान होत आहे. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एका जागेसह विविध ठिकाणच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील उद्या मतदान होईल. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, ठाणे जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या क्षेत्रात एकूण 7 लाख 3 हजार 378 मतदार आहेत. त्यात 3 लाख 25 हजार 932 महिला, 3 लाख 77 हजार 444 पुरूष; तर 2 इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी 937 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 53 जागा आहेत. त्यातील खोणी निवडणूक विभागाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता 52 जागांसाठी 152 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शहापूर (जागा 28), मुरबाड (16), कल्याण (12), भिवंडी (42) आणि अंबरनाथ (8) या पाच पंचायत समित्यांच्या एकूण 106 जागांसाठी मतदान होत आहे. त्यासाठी 297 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
वाशीम जिल्हा परिषदेच्या पांगरी नवघरे निवडणूक विभागाच्या रिक्त पदासाठीदेखील उद्या मतदान होत आहे. या एका जागेसाठी 3 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्याचबरोबर चाणजे (उरण), माटणे (दोडामार्ग), काथली खु. (नंदुरबार), किल्लारी (औसा), मलकापूर (अकोला) आणि मार्डी (मारेगाव) या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठीही उद्या मतदान होईल. या सर्व ठिकाणी 14 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल.
नगरपरिषदा/ नगरपंचायतींसाठी मतदान
हुपरी (जि. कोल्हापूर), नंदुरबार, नवापूर (जि. नंदुरबार), किनवट (जि. नांदेड), चिखलदरा (जि. अमरावती) आणि पांढरकवडा (जि. यवतमाळ) या नगरपरिषदा; तसेच वाडा (जि. पालघर), शिंदखेडा (जि. धुळे), फुलंब्री (जि. औरंगाबाद) आणि सालेकसा (जि. गोंदिया) या नगरपंचायतींच्या सदस्यपदांसह अध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीसाठीदेखील उद्या मतदान होईल. त्याचबरोबर मैंदर्गी (जि. सोलापूर), शहादा (जि. नंदुरबार), अंबाजोगाई (जि. बीड), जिंतूर (जि. परभणी), मंगरूळपीर (जि. वाशीम) आणि एटापल्ली (जि. गडचिरोली) या नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या प्रत्येकी एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठीही उद्या मतदान होत आहे. मतदान होत असलेल्या सर्व ठिकाणी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका आदींना सुट्टी देण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि जव्हार; तसेच नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपरिषदेसाठी 17 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे उद्या मतदान होत असलेल्या वाडा आणि नंदुरबार व नवापूरसह या दोन जिल्ह्यांतील सर्व सहा नगरपरिषदा/ नगरपंचायतींची मतमोजणी 18 डिसेंबर 2017 रोजी होईल. अन्य सर्व ठिकाणी 14 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल.
मुंबईत एका जागेसाठी मतदान
            बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.21 च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील उद्या (ता.13) मतदान होत आहे. त्यासाठी 2 उमेदवारांमध्ये सरळ लढत होत आहे. एकूण 41 हजार 52 मतदारांसाठी 32 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदान होत असलेल्या नगरपरिषदा/ नगरपंचायतींसंदर्भातील तपशील
नगरपरिषद/ नगरपंचायत
प्रभाग
जागा
उमेदवार
एकूण मतदार
मतदान केंद्रे
सदस्यपदासाठी
अध्यक्षपदासाठी
हुपरी
9
18
95
5
21,770
27
नंदुरबार
19
39
111
6
1,00,263
126
नवापूर
10
20
95
6
28,791
38
किनवट
9
18
108
6
23,593
36
चिखलदरा
8
17
42
6
3,906
8
पांढरकवडा
9
19
82
6
23,463
31
वाडा
17
17
79
5
10,918
17
शिंदखेडा
17
17
69
4
20,289
27
फुलंब्री
17
17
45
2
14,124
17
सालेकसा
17
17
59
5
2,715
17
एकूण
132
199
1,222
84
2,49,832
344

बुबनाळच्या उल्लेखनीय वाटचालीचे माल्टात आंतरराष्ट्रीय मंचाकडून कौतुक

बुबनाळच्या उल्लेखनीय वाटचालीचे
माल्टात आंतरराष्ट्रीय मंचाकडून कौतुक
मुंबई, दि.12: कोल्हापूर जिल्ह्यातील बुबनाळ गावाच्या उल्लेखनीय वाटचालीला माल्टा (युरोप) येथील परिषदेत विविध देशांकडून कौतुकाची थाप मिळाली; तसेच राज्य निवडणूक आयोगाने राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांबाबतही विविध देशांकडून कौतुक करण्यात आले. निमित्त होते राष्ट्रकुल स्थानिक स्वराज्य शासन मंचच्या (सीएलजीएफ) आंतरराष्ट्रीय परिषदेचे!
राष्ट्रकुल स्थानिक स्वराज्य शासन मंच हा राष्ट्रकुल मंडळाचा उपक्रम असून त्यामध्ये 53 देशांचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकशाहीचे बळकटीकरण करणे, त्यांना तांत्रिक स्वरूपाची मदत करणे, संशोधन करणे आणि आंतरराष्ट्रीय परिषदांच्या माध्यमातून उल्लेखनीय कामे व अनुभवांची देवाणघेवाण करणे या उद्देशाने सी.एल.जी.एफ. कार्यरत आहे. सी.एल.जी.एफ. तर्फे दर दोन वर्षांनी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जाते. यंदा ही परिषद माल्टाची राजधानी व्हॅलेटा येथे 21 ते 24 नोव्हेंबर 2017 या कालावधीत पार पडली. या परिषदेत बुबनाळची यशोगाथा आणि राज्य निवडणूक आयोगाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण करण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांना आमंत्रित करण्यात आले होते.
राज्य निवडणूक आयोगाने गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या मदतीने यापूर्वीच संशोधन अहवालही तयार केला आहे; तसेच श्री. सहारिया यांनी स्वत: बुबनाळ येथे भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा व पाहणी केली होती. त्या आधारावर श्री. सहारिया यांनी माल्टा येथील परिषदेत या विषयासह आयोगाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांबाबत सादरीकरण केले. श्री. सहारिया यांच्यासोबत आयोगाचे प्रभारी उपायुक्त अविनाश सणसदेखील परिषदेत सहभागी झाले होते.
बुबनाळमध्ये साधारणत: सन 2009 पर्यंत जमीन, पाणी व सामाजिक वादांमुळे गावातील विकास कामांना खीळ बसली होती. सन 2009 मध्ये गावातील एका जेष्ठ नागरिकानी एका सुकाणू समितीची स्थापना करून सर्व वादविवाद संपुष्टात आणण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यामुळे सन 2010 मधील ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून सर्व 11 सदस्य पदे महिलांना संधी देण्यात यावी; तसेच या सर्व महिला राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील नसाव्यात, असे आवाहन सुकाणू समितीने सन 2015 मध्ये ग्रामस्थांना केले होते. ग्रामस्थांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आज ग्रामपंचायतीचा यशस्वीरीत्या कारभार महिला पाहत आहेत. त्यांनी आपल्या कामाचा ठसादेखील उमटविला आहे. त्यामुळे गावाने आता कुस बदलली असून विकासाच्या दिशेन झेप घेतली आहे. हे कार्य खरोखरच प्रेरणादायी असल्याच्या प्रतिक्रिया विविध देशांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या.
राज्य निवडणूक आयोगाच्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांबाबतदेखील विविध देशांच्या प्रतिनिधींनी स्वारस्य दाखविले आहे. नामनिर्देशनपत्रांसाठी संकेतस्थळाची सुविधा, उमेदवारांच्या आर्थिक व गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या माहितीला व्यापक प्रसिध्दी, चॉटबॉट तंत्रज्ञानाचा वापर, राजकीय पक्षांची रद्द केलेली नोंदणी, मतदार जागृतीला दिलेले लोकचळवळीचे स्वरूप, विविध विषयांवर केलेले संशोधन इत्यादी उपक्रम निश्चितच अनुकरणीय असल्याच्या प्रतिक्रिया विविध देशांतील प्रतिनिधींनी व्यक्त केल्या. या उपक्रमांचा अभ्यास आणि प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी आम्ही येऊ, अशी इच्छा संयुक्त राष्ट्र महिला (यू.एन. वुमेन), ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमधील लोकल गव्हर्नमेंट इनोव्हेशन युनिट, श्रीलंका आणि मालदीव येथील प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केली. 

Friday, December 8, 2017

डहाणू, जव्हार आणि तळोद्यामध्ये 13 ऐवजी 17 डिसेंबरला मतदान

डहाणू, जव्हार आणि तळोद्यामध्ये
13 ऐवजी 17 डिसेंबरला मतदान
मुंबई, दि.08: पालघर जिल्ह्यातील डहाणू व जव्हार आणि नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारीत कार्यक्रमानुसार आता 13 डिसेंबर 2017 ऐवजी 17 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, या नगरपरिषदांच्या नामनिर्देशनपत्रांसदंर्भातील न्यायालयांचे निकाल आणि संबंधित अधिनियमातील तरतुदी लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार तीन ठिकाणी 17 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 18 डिसेंबर 2017 रोजी मतमोणजी होईल. त्याचबरोबर खोपोली नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.6-अ च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील 13 डिसेंबर 2017 ऐवजी 17 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार इगतपुरी, त्र्यंबक (जि. नाशिक) व जत (जि. सांगली) नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 10 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. हुपरी (जि. कोल्हापूर), नंदुरबार, नवापूर (जि. नंदुरबार), किनवट (जि. नांदेड), चिखलदरा (जि. अमरावती), पांढरकवडा (जि. यवतमाळ), वाडा (जि. पालघर), शिंदखेडा (जि. धुळे), फुलंब्री (जि. औरंगाबाद) आणि सालेकसा (जि. गोंदिया) या नगरपरिषदा/ नगरपंचायतींसाठी 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
इगतपुरी, त्र्यंबक आणि जत येथे उद्या मतदान                         
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबक आणि सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेसाठी रविवारी (ता.10) सदस्यपदांसोबतच थेट अध्यक्षपदासाठीदेखील मतदान होईल. त्याचबरोबर सटाणा (जि. नाशिक) नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 5-अ च्या रिक्तपदासाठीदेखील रविवारीच मतदान होणार आहे.
        इगतपुरी नगरपरिषदेच्या एकूण 9 प्रभागातील 18 जागांसाठी 79 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी 7 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. एकूण 24 हजार 468 मतदार असून त्यांच्यासाठी 34 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
         त्र्यंबक नगरपरिषदेच्या एकूण 8 प्रभागातील 17 जागांसाठी 57 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी 7 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. एकूण 10 हजार 614 मतदार असून त्यांच्यासाठी 17 मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे.
जत नगरपरिषदेच्या एकूण 10 प्रभागातील 20 जागांसाठी 76 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी 4 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. एकूण 24 हजार 560 मतदार असून त्यांच्यासाठी 36 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी मतदानाची वेळ असेल. तीनही नगरपरिषदांची मतमोजणी 11 डिसेंबर 2017 रोजी होईल.

Saturday, November 18, 2017

734 ग्रामपंचायतींसाठी 26 डिसेंबरला मतदान

734 ग्रामपंचायतींसाठी
26 डिसेंबरला मतदान
मुंबई, दि.18: राज्यातील विविध 27 जिल्ह्यांमधील 734 ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह थेट सरपंचपदासाठी 26 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असून 27 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
जानेवारी व फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 5 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2017 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 12 डिसेंबर 2017 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 14 डिसेंबर 2017 असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. 26 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल; परंतु गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये मतदानाची वेळ केवळ दुपारी 3 पर्यंत असेल. 27 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल.
      निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: ठाणे- 31, पालघर- 39, रायगड- 11, रत्नागिरी- 10, सिंधुदुर्ग- 16, नाशिक- 2, जळगाव- 100, नंदुरबार- 13, अहमदनगर- 67, पुणे- 99, सोलापूर- 64, सातारा- 19, सांगली- 5, कोल्हापूर- 12, औरंगाबाद- 2, बीड- 162, नांदेड- 4, परभणी- 2, उस्मानाबाद- 1, लातूर- 5, अमरावती- 13, अकोला- 3, वाशीम- 2, बुलडाणा- 43, वर्धा- 3, गोंदिया- 2 आणि गडचिरोली- 4. एकूण- 734.

Tuesday, November 7, 2017

बृहन्मुंबईतील प्रभाग क्रमांक 21 व 62 साठी 13 डिसेंबरला मतदान

बृहन्मुंबईतील प्रभाग क्रमांक 21 व 62 च्या
पोटनिवडणुकीसाठी 13 डिसेंबरला मतदान
मुंबई, दि.07: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 आणि 62 च्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, या पोटनिवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 20 ते 27 नोव्हेंबर 2017 या कालावधीत स्वीकारण्यात येतील. त्यांची छाननी 28 नोव्हेंबर 2017 रोजी होईल. 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. निवडणूक चिन्हांचे वाटप 2 डिसेंबर 2017 रोजी होईल. मतदान 13 डिसेंबर 2017 रोजी होईल. मतमोजणी 14 डिसेंबर 2017 रोजी होईल. 

17 नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी 10 आणि 13 डिसेंबरला मतदान

17 नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी
10 आणि 13 डिसेंबरला मतदान
मुंबई, दि.07: राज्यातील विविध 17 नगरपरिषदा/ नगरपंचायतींचे सदस्य व अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच जेजुरी नगरपरिषदेचे अध्यक्ष व इतर विविध ठिकाणच्या 10 सदस्यांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी दोन टप्प्यांत 10 डिसेंबर व 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, सर्व संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबक नगरपरिषदेचे सदस्य व अध्यक्षपदांसाठी 10 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2017 पर्यंत असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 नोव्हेंबर 2017 रोजी होईल. न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 28 नोव्हेंबर 2017; तर अपील असलेल्या ठिकाणी अपिलाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 10 डिसेंबर 2017 रोजी मतदान होईल. 11 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल.
डहाणू, जव्हार, हुपरी, जत, नंदुरबार, नवापूर, तळोदा, किनवट, चिखलदरा, पांढरकवडा व आमगांव या 11 नगरपरिषदांचे सदस्य व अध्यक्षपदांसाठी; तसेच वाडा, फुलंब्री, सिंदखेडा व सालेकसा या चार नगरपंचायतींचे सदस्य आणि अध्यक्षपदांसाठी 13 डिसेंबर 2017 रोजी मतदान होईल. नामनिर्देशनपत्रे 18 ते 24 नोव्हेंबर 2017 या कालावधीत स्वीकारली जातील. 25 नोव्हेंबर 2017 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. मतदान 13 डिसेंबर 2017 रोजी होईल. मतमोजणी 14 डिसेंबर 2017 रोजी होईल.