बुबनाळच्या उल्लेखनीय वाटचालीचे
माल्टात आंतरराष्ट्रीय मंचाकडून कौतुक
मुंबई, दि.12: कोल्हापूर
जिल्ह्यातील बुबनाळ गावाच्या उल्लेखनीय वाटचालीला माल्टा (युरोप) येथील परिषदेत
विविध देशांकडून कौतुकाची थाप मिळाली; तसेच राज्य निवडणूक आयोगाने राबविलेल्या
नावीन्यपूर्ण उपक्रमांबाबतही विविध देशांकडून कौतुक करण्यात आले. निमित्त होते
राष्ट्रकुल स्थानिक स्वराज्य शासन मंचच्या (सीएलजीएफ) आंतरराष्ट्रीय परिषदेचे!
राष्ट्रकुल स्थानिक स्वराज्य शासन
मंच हा राष्ट्रकुल मंडळाचा उपक्रम असून त्यामध्ये 53 देशांचा समावेश आहे. स्थानिक
स्वराज्य संस्थांमधील लोकशाहीचे बळकटीकरण करणे, त्यांना तांत्रिक स्वरूपाची मदत
करणे, संशोधन करणे आणि आंतरराष्ट्रीय परिषदांच्या माध्यमातून उल्लेखनीय कामे व
अनुभवांची देवाणघेवाण करणे या उद्देशाने सी.एल.जी.एफ. कार्यरत आहे. सी.एल.जी.एफ.
तर्फे दर दोन वर्षांनी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जाते. यंदा ही परिषद माल्टाची
राजधानी व्हॅलेटा येथे 21 ते 24 नोव्हेंबर 2017 या कालावधीत पार पडली. या परिषदेत
बुबनाळची यशोगाथा आणि राज्य निवडणूक आयोगाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण
करण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांना आमंत्रित करण्यात आले होते.
राज्य निवडणूक आयोगाने गोखले
राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या मदतीने यापूर्वीच संशोधन अहवालही तयार केला
आहे; तसेच श्री. सहारिया यांनी स्वत: बुबनाळ येथे भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा व
पाहणी केली होती. त्या आधारावर श्री. सहारिया यांनी माल्टा येथील परिषदेत या
विषयासह आयोगाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांबाबत सादरीकरण केले. श्री. सहारिया
यांच्यासोबत आयोगाचे प्रभारी उपायुक्त अविनाश सणसदेखील परिषदेत सहभागी झाले होते.
बुबनाळमध्ये साधारणत: सन 2009
पर्यंत जमीन, पाणी व सामाजिक वादांमुळे गावातील विकास कामांना खीळ बसली होती. सन
2009 मध्ये गावातील एका जेष्ठ नागरिकानी एका सुकाणू समितीची स्थापना करून सर्व
वादविवाद संपुष्टात आणण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले होते. त्यास उत्स्फूर्त
प्रतिसाद लाभल्यामुळे सन 2010 मधील ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध पार
पडल्या. सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून सर्व 11
सदस्य पदे महिलांना संधी देण्यात यावी; तसेच या सर्व महिला राजकीय पार्श्वभूमी
असलेल्या कुटुंबातील नसाव्यात, असे आवाहन सुकाणू समितीने सन 2015 मध्ये
ग्रामस्थांना केले होते. ग्रामस्थांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आज
ग्रामपंचायतीचा यशस्वीरीत्या कारभार महिला पाहत आहेत. त्यांनी आपल्या कामाचा
ठसादेखील उमटविला आहे. त्यामुळे गावाने आता कुस बदलली असून विकासाच्या दिशेन झेप
घेतली आहे. हे कार्य खरोखरच प्रेरणादायी असल्याच्या प्रतिक्रिया विविध देशांतील
मान्यवरांनी व्यक्त केल्या.
राज्य निवडणूक आयोगाच्या विविध
नावीन्यपूर्ण उपक्रमांबाबतदेखील विविध देशांच्या प्रतिनिधींनी स्वारस्य दाखविले
आहे. नामनिर्देशनपत्रांसाठी संकेतस्थळाची सुविधा, उमेदवारांच्या आर्थिक व
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या माहितीला व्यापक प्रसिध्दी, चॉटबॉट तंत्रज्ञानाचा
वापर, राजकीय पक्षांची रद्द केलेली नोंदणी, मतदार जागृतीला दिलेले लोकचळवळीचे
स्वरूप, विविध विषयांवर केलेले संशोधन इत्यादी उपक्रम निश्चितच अनुकरणीय
असल्याच्या प्रतिक्रिया विविध देशांतील प्रतिनिधींनी व्यक्त केल्या. या उपक्रमांचा
अभ्यास आणि प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी आम्ही येऊ, अशी इच्छा संयुक्त राष्ट्र
महिला (यू.एन. वुमेन), ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमधील लोकल गव्हर्नमेंट इनोव्हेशन
युनिट, श्रीलंका आणि मालदीव येथील प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केली.