Search This Blog

Thursday, November 24, 2022

अचूक विधानसभा मतदार याद्या आवश्यक

महानगरपालिका, नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांकरिता 
अचूक विधानसभा मतदार याद्या आवश्यक

मुंबई, दि. 25 (रानिआ): विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांतील अपूर्ण आणि चुकीचे पत्ते व त्यात नोंदविलेल्या मतदारांच्या नावांमुळे महानगरपालिकांच्या प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यकतेनुसार इमारत, वस्ती, कॉलनी राहिवास क्षेत्राप्रमाणे पत्त्यामध्ये दुरूस्ती करण्याकरिता तातडीने मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान व मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी काल संबंधितास दिले.

विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांवरून प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात श्री. मदान यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. श्री. देशपांडे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यावेळी उपस्थित होते.

श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगातर्फे सध्या विधानसभा मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यांतर्गत 8 डिसेंबर 2022 पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे याच कालावधीत ही मोहीम राबवावी. एखाद्या मतदाराचा संपूर्ण पत्ता असूनही तो चुकीच्या सेक्शन ॲड्रेसमध्ये जोडण्यात आला असल्यास तो दुरूस्त करावा. शक्य असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार वेगळा सेक्शन ॲड्रेस तयार करावा.

श्री. देशपांडे म्हणाले की, या मोहीम काळात मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी प्रत्येक यादी भागाचा बारकाईने आढावा घ्यावा. विशेषत: नवीन इमारतींबाबत जास्त गोंधळ आढळून येतो. तो टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची मदत घेवून नवीन सेक्शन ॲड्रेस संकलित करून मतदार नोंदणी अधिकारी यांनी यादी भागात पत्त्यानुसार सेक्शन तयार करून त्या ठिकाणी राहणाऱ्या मतदारांची नावे नोंदविले जातील, याची दक्षता घ्यावी.

श्री. कुरुंदकर यांनी सांगितले की, सेक्शन ॲड्रेससंदर्भात शहरी भागातून मोठ्याप्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे. संबंधित महानगरपालिका आयुक्तांनी यात स्वत: लक्ष घालावे. काही नगरपालिका क्षेत्रातही अशा तक्रारी असतात. तेथेदेखील दक्षता घेण्यात यावी.

 

Wednesday, November 9, 2022

थेट सरपंचपदांसह 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान

 थेट सरपंचपदांसह 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान 

मुंबई, दि. 9 (रानिआ): राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. 

श्री. मदान यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी  सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या: अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.

Sunday, October 16, 2022

1079 ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान

 विविध जिल्ह्यांतील 1079 ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान

मुंबई, दि. 16 (रानिआ): विविध 18 जिल्ह्यांमधील 1 हजार 79 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. 

राज्य निवडणूक आयोगाने 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या; तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात 1 हजार 79 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30  ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी 64.83 टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा होत्या. नक्षलग्रस्तभागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी उद्या (ता. 17 ऑक्टोबर) मतमोजणी होईल.

मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 134, पालघर- 336, रायगड- 16, रत्नागिरी- 36, सिंधुदुर्ग- 4, नाशिक- 187, नंदुरबार- 200, पुणे- 1, सातारा- 4, कोल्हापूर- 3, अमरावती- 1, वाशीम- 1, नागपूर- 15, वर्धा- 9, चंद्रपूर- 92, भंडारा- 19, गोंदिया- 5 आणि गडचिरोली- 16. एकूण- 1079.