Search This Blog

Wednesday, October 5, 2022

7 हजार 649 ग्रा.पं.साठी 13 ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

7 हजार 649 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

मुंबई, दि. 6 (रानिआ): राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 7 हजार 649 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

विधानसभा मतदारसंघाच्या 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 21 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. कारण विधानसभेच्या संबंधित तारखेला अस्तित्वात असलेल्या याद्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आहे तशा वापरल्या जातात. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागनिहाय यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

Sunday, September 18, 2022

547 ग्रामपंचायतींसाठी 76 टक्के मतदान

   विविध जिल्ह्यांतील 547 ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार 76 टक्के मतदान

मुंबई, दि. 18 (रानिआ): राज्यातील विविध 16 जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 76 टक्के मतदान झाले. यात सदस्य पदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले.  
         राज्य निवडणूक आयोगाने 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची 12 ऑगस्ट 2022 रोजी घोषणा केली होती. त्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आज प्रत्यक्षात 547 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत सरासरी 66.10 टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी सायंकाळ उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. या सर्व संबंधित ठिकाणी मतमोजणी उद्या (ता. 19 सप्टेंबर) होईल.

Thursday, September 15, 2022

ग्रामपंचायत महिला सदस्य प्रशिक्षण

डिजिटल कारभाराद्वारे आम्हीही देऊ गावाच्या विकासात योगदान
ग्रामपंचायत महिला सदस्यांच्या प्रशिक्षणानंतरच्या भावना; 16 हजार महिला सदस्यांना प्रशिक्षण

मुंबई, दि. 15 (रानिआ): ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्हीही गावाच्या विकासात योगदान देऊ शकतो आणि डिजिटल कारभारातही आम्ही मागे राहणार नाही. सरपंचासाठी असलेल्या डिजिटल सहीचा दक्षतापूर्व व प्रभावीपणे वापरू, असा आत्मविश्वास राज्यातील ग्रामपंचायत महिला सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षणानंतर अनेक महिला सदस्यांनी व्यक्त केला.

विविध जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार ग्रामपंचायतीच्या जानेवारी 2021 मध्ये निवडणुका पार पडल्या. यात सुमारे 16 हजार महिला सदस्य निवडून आल्या होत्या. त्यांना ग्रामपंचायतीच्या कारभाराची माहिती व्हावी, या उद्देशाने ‘पंचायत कारभार परिचय’ प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. राज्य निवडणूक आयोग, इंस्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन फॉर गुड गर्व्हनन्स, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हल्पमेंट या संस्थांच्यावतीने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे चालविण्यात येणाऱ्या बचत गटातील 80 महिलांची प्रारंभी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांना रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हल्पमेंटकडून प्रशिक्षण देण्यात आले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुकास्तरावरील बचत गटांच्या फेडरेशनच्या (सीएमआरसी) माध्यमातून ग्रामपंचायत महिला सदस्यांशी गावपातळीवर समन्वय साधण्यात आला. त्यामाध्यमातून ऑनलाईन पद्धतीने हे प्रशिक्षण देण्यात आले. तांत्रिक सुविधांचा आभाव असलेल्या ठिकाणी ऑफलाईन पध्दतीने प्रशिक्षण देण्यात आले. एकूण 500 बॅचेसच्या माध्यमातून 16 हजार महिला सदस्यांना हे प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य होते. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली.

 प्रशिक्षणानंतर अनेक ग्रामपंचायत महिला सदस्यांनी प्रसिक्षणासंदर्भात उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. “ग्रामपंचायतीचा कारभार, सभा- बैठका, ग्रामविकास समित्या, अर्थव्यवस्थापन, ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्याच्या जबाबदाऱ्या, सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे कर्तव्ये इत्यादीसंदर्भातील सर्वंकष माहिती अत्यंत सोप्या भाषेत या प्रशिक्षणामुळे मिळू शकली,” असे जळगाव जिल्ह्यातील श्रीमती आशा जाधव यांनी सांगितले. “मी सरपंच असून  माझ्या मनात डिजिटल सहीसंदर्भात  काही  प्रश्न होते. त्यांची अत्यंत सुलभपणे प्रशिक्षणात उत्तरे मिळाली. त्यामुळे मी आता लक्षपूर्वक आणि प्रभावीपणे डिजिटल सहीचा वापर करू शकेल,” अशी प्रतिक्रिया यवतमाळ जिल्ह्यातील वैशाली पाटील यांनी व्यक्त केली.

“पंचायत कारभार परिचय प्रशिक्षणामुळे ग्रामपंचायत महिला सदस्य अधिक प्रभावीपणे काम करू  शकतील व ग्रामविकासात मोलाची भूमिका बजावू शकतील. त्यांच्यातील नेतृत्व गुणांना अधिक  प्रोत्साहन मिळेल. त्यांना पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा,” अशा शब्दांत राज्य निवडणूक  आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी प्रशिक्षणाबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.