Search This Blog

Thursday, August 4, 2022

महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया स्थागित

महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया स्थागित

मुंबई, दि. 04 (रानिआ): राज्य शासनाने मुंबई महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुधारणा केल्याच्या पार्श्वभूमीवर उद्या (ता. 5 ऑगस्ट) होणारी नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली आहे. त्याचबरोबर अन्य 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात येणारी अंतिम आरक्षणाची अधिसूचनादेखील स्थगित करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

औरंगाबाद, नांदेड- वाघाळा, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल आणि मीरा-भाईंदर या 9 महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या आरक्षण सोडत काढण्यात येणार होती. ती आता काढण्यात येणार नाही. बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या 14 महानगरपालिकांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचनादेखील प्रसिद्ध केली जाणार नाही.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सुमारे 78 टक्के मतदान

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सुमारे 78 टक्के मतदान

मुंबई, दि. 4 (रा.नि.आ.): राज्यातील विविध 15 जिल्ह्यांमधील 62 तालुकांत्यातील 238 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 78 टक्के मतदान झाले.

राज्य निवडणूक आयोगाने 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची 29 जून 2022 रोजी घोषणा केली होती. त्यातील 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आज प्रत्यक्षात 238 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. सर्व ठिकाणी मतमोजणी 5 ऑगस्ट 2022 रोजी होईल.

मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: नाशिक- 36, धुळे- 41, जळगाव- 20, अहमदनगर- 13, पुणे- 17, सोलापूर- 25, सातारा- 7, सांगली- 1, औरंगाबाद- 16, बीड- 13, परभणी- 2, उस्मानाबाद- 9, जालना- 27, लातूर- 6, आणि बुलडाणा- 5. एकूण- 238.