Search This Blog

Wednesday, June 29, 2022

महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी 3 जुलैपर्यंत मुदतवाढ

 महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी 3 जुलैपर्यंत मुदतवाढ

 

मुंबई, दि. 29 (रानिआ): विविध 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी असलेली 1 जुलै 2022 पर्यंतची मुदत आता 3 जुलै 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित महानगरपालिका, त्यांचे संकेतस्थळ आणि ट्रू- व्होटर मोबाईल ॲपवरही उपलब्ध आहेत. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत होती; परंतु ही मुदत आता 3 जुलै 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यासाठी रविवार व शनिवारच्या सुट्टीच्या दिवशीदेखील आवश्यक ती व्यवस्था करण्यात येणार आहे.

महानगरपालिका कार्यालय किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या ठिकाणी आणि ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारेदेखील हरकती व सूचना दाखल करता येतील. ट्रू- व्होटर मोबाईल ॲप प्ले स्टोअरवरून आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करता येईल. त्याआधारे प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत आपले नाव शोधून त्याबाबत हरकत असल्यास तीही दाखल करता येईल. व्होटर लीस्ट सर्च या मेनूवर क्लिक केल्यावर आपले नाव व मोबाईल नंबर टाकून पुढे जाता येईल. नाव शोधल्यावर आपला संपूर्ण तपशील दिसू शकेल. त्यासंदर्भातील हरकतीसाठी व्होटर लीस्ट ऑबजेक्शन यावर क्लिक करून व्होटर लीस्ट इलेक्शन प्रोग्राम 2022 निवडून पुढे योग्य त्या पर्यायावर जाऊन आपली हरकत नोंदविता येईल.

विधानसभा मतदारसंघाची यादी प्रभागनिहाय विभाजित करताना त्यात नवीन नावांचा समावेश करणे किंवा नावे वगळण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही. एखाद्या मतदारास चुकीचा प्रभाग वाटप झाल्यास किंवा विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही महानगरपालिकेच्या मतदार यादीत नाव नसल्यास, हरकत दाखल करता येते. हरकती व सूचना दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असली तरी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 9 जुलै 2022 रोजीच प्रसिद्ध करण्यात येतील.

271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्टला मतदान

 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्टला मतदान   

 

मुंबई, दि. 29 (रानिआ): पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 62 तालुकांत्यातील 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 5 ऑगस्ट 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक  आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.  

श्री. मदान यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या 17 मे 2022 रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 62 तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदार 5 जुलै 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे 12 ते 19 जुलै 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे 16 आणि 17 जुलै 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 20 जुलै 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 22 जुलै 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतदान 4 ऑगस्ट 2022 रोजी  सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 5 ऑगस्ट 2022 रोजी होईल.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या: नाशिक: बागलाण- 13, निफाड- 1, सिन्नर- 2, येवला- 4, चांदवड- 1, देवळा- 13 आणि नांदगाव- 6. धुळे: धुळे- 2, साक्री- 49 आणि शिंदखेडा- 1. जळगाव: रावेर- 12, अमळनेर- 1, एरंडोल- 2, पारोळा- 3 आणि चाळीसगाव- 6. अहमदनगर: अहमदनगर- 3, श्रीगोंदा- 2, कर्जत- 3,  शेवगाव- 1, राहुरी- 3 आणि संगमनेर- 3. पुणे: हवेली- 5, शिरुर- 6, बारामती- 2, इंदापूर- 4 आणि पुरंदर- 2. सोलापूर: सोलापूर- 2, बार्शी- 2, अक्कलकोट- 3, मोहोळ- 1, माढा- 2,  करमाळा- 8, पंढरपूर- 2, माळशिरस- 1 आणि मंगळवेढा- 4. सातारा: कराड- 9 आणि फलटण- 1. सांगली: तासगाव- 1. औरंगाबाद: औरंगाबाद- 1, पैठण- 7, गंगापूर- 2, वैजापूर- 2, खुलताबाद- 1, सिल्लोड- 3, जालना- 6, परतूर- 1, बदनापूर- 19 आणि मंठा- 2. बीड: बीड- 3, गेवराई- 5 आणि अंबेजोगाई- 5. लातूर: रेणापूर- 4, देवणी- 1 आणि शिरूर अनंतपाळ- 4. उस्मानाबाद: तुळजापूर- 2, कळंब- 1, उमरगा- 5, लोहारा- 2 आणि वाशी- 1. परभणी: सेलू- 3. बुलढाणा: खामगाव- 2 आणि मलकापूर- 3.  एकूण- 271.        

Monday, June 27, 2022

मतदार यादीसाठी ट्रू- व्होटर मोबाईल ॲपमुळे नाव शोधणे आणि हरकती दाखल करण्याची सुविधा

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध
ट्रू- व्होटर मोबाईल ॲपमुळे नाव शोधणे आणि हरकती दाखल करण्याची सुविधा

मुंबई, दि. 27 (रानिआ): राज्यातील विविध 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यातील मतदारांची नावे तपासण्याची आणि हरकती दाखल करण्याची सुविधा ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.  

 श्री. मदान यांनी सांगितले की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात आल्या आहेत. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती सूचना दाखल करता येतील.

 प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित महानगरपालिकेत किंवा त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यात आपले नाव तपासता येईल. ती सुविधा आता ट्रू- व्होटर मोबाईल ॲपमध्येही उपलब्ध करून देण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघाची यादी प्रभागनिहाय विभाजित करताना त्यात नवीन नावांचा समावेश करणे किंवा नावे वगळण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही. एखाद्या मतदारास चुकीचा प्रभाग वाटप झाल्यास किंवा विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही महानगरपालिकेच्या मतदार यादीत नाव नसल्यास, हरकत दाखल करता येते. या हरकतींचा लवकर निपटारा होण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने एक नमुना अर्ज तयार केला आहे. त्याद्वारे आपण हरकत घेऊ शकतो आणि ट्रू- व्होटर मोबाईल ॲपद्वारेही सोप्या पद्धतीने हरकत दाखल करता यते, असेही श्री. मदान यांनी सांगितले


Thursday, June 16, 2022

महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची 23 जूनला प्रसिद्धी

 

महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची 23 जूनला प्रसिद्धी

मुंबई, दि. 16 (रानिआ): बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.

राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 जून 2022 रोजी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 17 जून 2022 रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार होत्या; परंतु आता सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार याद्या 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 9 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात.

Friday, June 10, 2022

प्रारूप मतदार याद्यांची 21 जूनला प्रसिद्धी

221 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी प्रारूप मतदार याद्यांची 21 जूनला प्रसिद्धी
              मुंबई, दि. 10 (रानिआ): विविध जिल्ह्यांमधील 221 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 21 जून 2022 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 27 जून 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज येथे केली.
                मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेल्या 221 नगरपरिषदा/ पंचायतींमध्ये 208 नगरपरिषदा आणि 13 नगरपंचायतींचा समावेश आहे. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 21 जून 2022 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 21 ते 27 जून 2022 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 1 जुलै 2022 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 5 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
         प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात.

Thursday, June 9, 2022

नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या आरक्षणाची 13 जूनला सोडत

 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या आरक्षणाची 13 जूनला सोडत

मुंबई, दि. 09 (रानिआ): राज्यभरातील 216 नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 13 जून 2022 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने 15 ते 21 जून 2022 या कालावधित हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज येथे केली.
        आरक्षणाची सोडत काढण्यात येणाऱ्या 216 मध्ये 208 नगरपरिषदा आणि 8 नगरपंचायती आहेत. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जामाती माहिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्यपदांसाठी ही सोडत काढण्यात येईल. आरक्षण सोडतीसाठी संबंधित जिल्हाधिकारी उद्या (ता. 10 जून) नोटीस प्रसिद्ध करतील. 13 जून 2022 रोजी संबंधित ठिकाणी आरक्षण सोडत काढण्यात येईल. आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या 15 ते 21 जून 2022 या कालावधीत दाखल करता येतील. संबंधित विभागीय आयुक्त सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देतील. आरक्षणाची अंतिम अधिसूचना 1 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असेही आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Wednesday, May 11, 2022

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी 5 जूनला मतदान

                             जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी 5 जूनला मतदान

मुंबई, दि. 11 (रानिआ): पालघर, धुळे, नंदुरबार, वाशीम, नागपूर आणि अकोला जिल्हा परिषदेतील 2 निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील 6 निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 जून 2022 रोजी मतदान; तर 6 जून 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज केली.

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या चितवी (ता. नवापूर) आणि अकोला जिल्हा परिषदेच्या हातरुण (ता. बाळापूर) या निवडणूक विभागासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. पोशेरा (मोखडा, जि. पालघर), हिसाळे (शिरपूर, जि. धुळे), हट्टी खु. (साक्री, जि. धुळे), असली (अक्राणी, जि. नंदुरबार), ब्राम्हणवाडा न- मारसुळ (मालेगाव, जि. वाशीम) आणि चणकापूर (सावनेर, जि. नागपूर) या पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान होईल. संबंधित निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणांत आजपासून आचारसंहिता लागू झाली असून निकाल जाहीर होईपर्यंत ती लागू राहील. नामनिर्देशनपत्र 17 ते 23 मे 2022 या कालावधीत दाखल करता येतील. 22 मे 2022 रोजी रविवारच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 24 मे 2022 रोजी होईल. 5 जून 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 6 जून 2022 रोजी सकाळी दहा वाजता सुरू होईल.

Friday, May 6, 2022

नगरपरिषद/नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेवरील हरकती व सूचनांसाठी 14 मे पर्यंत मुदत

नगरपरिषद/नगरपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेवरील
हरकती व सूचनांसाठी 14 मे पर्यंत मुदत

मुंबई, दि. 06 (रानिआ): राज्यातील विविध 216 नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर 10 ते 14 मे 2022 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कार्यवाही 10 मार्च 2022 रोजी असलेल्या टप्प्यांपासून पुढे सुरू करावी, असा आदेश 4 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने ही कार्यवाही सुरू केली आहे. यात 208 नगरपरिषदा व 8 नगरपंचायतींचा समावेश आहे. त्यांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 10 ते 14 मे 2022 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यावर जिल्हाधिकारी 23 मे 2022 पर्यंत सुनावणी देतील. प्रभाग रचनेचे प्रारूप 10 मार्च 2022 रोजीच प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावेळी प्राप्त झालेल्या व आता नव्याने प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांवर ही एकत्रित सुनावणी देण्यात येईल. अंतिम प्रभाग रचना 7 जून 2022 पर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

 


Wednesday, March 2, 2022

राजकीय पक्ष बैठक

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत राजकीय पक्षांशी चर्चा
    मुंबई, दि. 2 (रानिआ): राज्यातील 14 महानगरपालिका, 208 नगरपरिषदा, 14 नगरपंचायती, 25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आयोगाच्या कार्यालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना निवडणुकांच्या पूर्वतयारीबाबत माहिती देण्यात आली.  
    राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर आणि उपायुक्त अविनाश सणस यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पार्टी, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), बहुजन समाज पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करण्यासाठी राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी विविध सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. राजकीय पक्ष नोंदणीपासून तर त्यांचे विविध अहवाल सादर करण्यापर्यंतची सर्व सुविधा लवकरच ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अद्ययावत माहितीकरिता आयोगाच्या संकेतस्थळासह उमेदवारांसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा असेल. त्याचबरोबर उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्यासाठी, मतदारांना उमेदवारांबाबत माहिती जाणून घेण्यासाठी; तसेच मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी ट्रू व्होटर मोबाईल ॲपचीही सुविधा असेल, असे श्री. मदान यांनी यावेळी सांगितले.