Search This Blog

Friday, November 28, 2025

प्रचाराची मुदत

 नगरपरिषद व नगरपंचायींच्या निवडणुकांसाठी 1 डिसेंबरला रात्री 10 पर्यंत प्रचाराची मुदत

मुंबई, दि. 28 (रानिआ): नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’ मधील तरतुदीनुसार 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 पर्यंत असेल.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांस संबंधित कायद्यांमधील तरतुदींनुसार घेतल्या जातात. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसंदर्भातील कायद्यात जाहीर प्रचाराचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजल्यापासून प्रचार पूर्णपणे बंद होईल. त्यानंतर प्रचारसभा, मोर्चे आणि ध्वनिक्षेपकाचा (Loudspeaker) वापर करता येणार नाही. त्याचबरोबर निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारण करता येणार नाही.


Saturday, November 22, 2025

मतदार याद्यांसंदर्भातील तक्रारी

मतदार याद्यांसंदर्भातील तक्रारी संबंधित महानगरपालिका आयुक्तांकडे दाखल कराव्यात 

मुंबई, दि. 22 (रानिआ): महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महानगरपालिका आयुक्तांच्या स्तरावर करण्यात आले असून, त्याबाबत हरकती व सूचना किंवा काही तक्रारी असल्यास त्या 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत संबंधित महानगरपालिकेत दाखल कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांकरिता 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून, त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. या मूळ मतदार याद्या भारत निवडणूक आयोगाने तयार केल्या आहेत. त्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महानगरपालिका स्तरावर महानगरपालिका आयुक्तांच्या देखरेखीखाली करण्यात आले आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबर 2025 रोजी संबंधित महानगरपालिकेच्या ठिकाणी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यातील आपले नाव https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/SearchName या संकेतस्थळावर शोधता येईल. त्यावर 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इ. स्वरूपाची कार्यवाही केली जात नाही. मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुकांसंदर्भात; तसेच मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील हरकती व सूचना महानगरपालिका आयुक्तांकडे दाखल करता येतील, असेही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

Saturday, November 15, 2025

रविवारीसुद्धा नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

 नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी रविवारीसुद्धा ऑफलाईन नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

 

मुंबई, दि. 15 (रानिआ): नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे ऑनलाईन; तसेच ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा उद्यादेखील (रविवारी, ता. 16) स्वीकारली जातील, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.  

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा नामनिर्देशनपत्र सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी (ता. 16) देखील सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. नामनिर्देशनपत्र व शपथपत्र  दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. अधिकाधिक इच्छूक उमेदवारांनी रविवारीच नामनिर्देशनपत्रे दाखल केल्यास अखेरच्या दिवशी ऐनवेळी होणारी धावपळ टळू शकेल, असेही राज्य निवडणूक आयोगाने आपल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.