Search This Blog

Friday, July 12, 2024

पोटनिवडणुकीसाठी 11 ऑगस्टला मतदान

 

नगरपरिषद व नगरपंचायतीमधील रिक्तपदांच्या

 पोटनिवडणुकीसाठी 11 ऑगस्टला मतदान

 

मुंबई, दि. 12 (रानिआ): विविध नगरपंचायती व एका नगरपरिषदेतील एकूण 11 सदस्यपदांच्या रिक्त जागांसाठी आणि हातकणंगले (जि. कोल्हापूर) नगरपंचायतीच्या थेट अध्यक्षपदाच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी 11 ऑगस्ट 2024 रोजी मतदान होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

खालापूर, पाली (जि. रायगड), निफाड, सुरगाणा (जि. नाशिक), बोदवड (जि. जळगाव), धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु. (जि. नंदुरबार), कवठेमहांकाळ, खानापूर (जि. सांगली), चंदगड (जि. कोल्हापूर) आणि बाभुळगाव (जि. यवतमाळ) या नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या प्रत्येकी एका रिक्त जागेसाठी मतदान होईल. त्याचबरोबर कन्हान-पिपरी (जि. नागपूर) नगरपरिषदेच्या सदस्यपदाच्या एका रिक्त जागेसाठीदेखील मतदान होणार आहे.

नामनिर्देशनपत्रे 18 ते 24 जुलै 2024 या कालावधीत स्वीकारली जातील. रविवारी सुट्टीच्या दिवशी मात्र नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. 25 जुलै 2024 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. 11 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 12 ऑगस्ट 2024 रोजी मतमोजणी होईल, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.