जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 11 ऑगस्टला मतदान
मुंबई, दि. 19 (रानिआ): नागपूर जिल्हा परिषदेच्या एका व विविध पंचायत समित्यांच्या चार रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 11 ऑगस्ट 2024 रोजी मतदान होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केले.
नागपूर जिल्हा परिषदेतील पारशिवनी तालुक्यातील टेकाडी (को.ख.) या निवडणूक विभागाची जागा रिक्त आहे; तसेच धुळे पंचायत समितीच्या बोरीस, बाळापूर (जि. अकोला) पंचायत समितीच्या बटवाडी बु, काटोल (जि. नागपूर) पंचायत समितीच्या पारडसिंगा आणि रामटेक (जि. नागपूर) पंचायत समितीच्या बोथिया पालोरा या निर्वाचक गणांच्या जागा रिक्त आहेत. या पाचही जागांसाठी ही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
नामनिर्देशनपत्रे 23 ते 29 जुलै 2024 या कालावधीत स्वीकारली जातील. रविवारी (ता. 28 जुलै) या सुट्टीच्या दिवशी मात्र नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. 30 जुलै 2024 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हाचे वाटप 5 ऑगस्ट 2024 रोजी होईल. 11 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 12 ऑगस्ट 2024 रोजी मतमोजणी होईल, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.