Search This Blog

Thursday, November 1, 2018

नगरपरिषदा/ नगरपंचायतींसाठी 9 डिसेंबरला मतदान


नगरपरिषदा/ नगरपंचायतींसाठी
9 डिसेंबरला मतदान
मुंबई, दि. 1 (रानिआ): नेर- नबाबपूर (जि. यवतमाळ), लोहा (नांदेड), मौदा (नागपूर), रिसोड (वाशीम), ब्रम्हपुरी (चंद्रपूर) आणि शेंदुर्णी (जळगाव) या नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 डिसेंबर 2018 रोजी मतदान; तर 10 डिसेंबर 2018 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, सर्व संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. यातील मौदा आणि शेंदुर्णी या दोन नगरपंचायती आहेत. उर्वरित सर्व नगरपरिषदा आहेत. नामनिर्देशनपत्रे 12 ते 19 नोव्हेंबर 2018 या कालावधीत भरता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 20 नोव्हेंबर 2018 रोजी होईल. न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 29 नोव्हेंबर 2018 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी अपिलाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. मतदान 9 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.