Search This Blog

Monday, June 25, 2018

सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महानगरपालिकेसाठी 1 ऑगस्टला मतदान


सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महानगरपालिकेसाठी 1 ऑगस्टला मतदान
वसई-विरार महानगरपालिकेच्या एका रिक्त पदासाठीदेखील मतदान
-राज्य निवडणूक आयुक्त
मुंबई, दि. 25: सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक; तसेच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी 1 ऑगस्ट 2018 रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 3 ऑगस्ट 2018 रोजी होईल. त्यासाठी संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.
            श्री. सहारिया यांनी सांगितले की, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेची मुदत 13 ऑगस्ट 2018 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 5 लाख 2 हजार 793 असून मतदारांची संख्या सुमारे 4 लाख 23 हजार 366 इतकी आहे. एकूण 20 प्रभागांतील 78 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 39 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 11, अनुसूचित जमातीसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 21 जागा राखीव आहेत.
            जळगाव महानगरपालिकेची मुदत 19 सप्टेंबर 2018 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 4 लाख 60 हजार 228 असून मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 65 हजार 15 इतकी आहे. एकूण 19 प्रभागातील 75 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 38 जागा राखीव आहेत.अनुसूचित जातीसाठी 5, अनुसूचित जमातीसाठी 4; तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 20 जागा राखीव आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
            वसई-विरार शहर महानगरपालिकेतील प्रभाग क्र. 97 च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील 1 ऑगस्ट 2018 रोजी मतदान होईल. या सर्व ठिकाणी 4 जुलै 2018 पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात होईल. 1 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी  3 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10 वा. सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.

निवडणूक कार्यक्रम
·         नामनिर्देशनपत्रे दाखल करणे      :           4 ते 11 जुलै 2018
·         नामनिर्देशनपत्रांची छाननी          :           12 जुलै 2018
·         उमेदवारी मागे घेणे                    :           17 जुलै 2018 पर्यंत
·         निवडणूक चिन्ह वाटप               :           18 जुलै 2018
·         मतदान                                    :           1 ऑगस्ट 2018
·         मतमोजणी                               :           3 ऑगस्ट 2018
·         निकालाची राजपत्रात प्रसिध्दी     :           6 ऑगस्ट 2018 पर्यंत


Friday, June 15, 2018

नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी 15 जुलै रोजी मतदान


नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी
15 जुलै रोजी मतदान
मुंबई, दि. 15: भोर (जि. पुणे), वडगाव (पुणे), मुक्ताईनगर (जळगाव), बार्शीटाकळी (अकोला), वानाडोंगरी (नागपूर) आणि पारशिवनी (नागपूर) या नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच विविध 11 नगरपरिषदा/ नगरपंचायतींतील प्रत्येकी एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी 15 जुलै 2018 रोजी मतदान; तर 16 जुलै 2018 रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, भोर नगरपरिषदेची मुदत संपत आहे. त्याचबरोबर बार्शीटाकळी आणि वानाडोंगरी या नवनिर्मित नगरपरिषदा; तर मुक्ताईनगर, वडगाव व पारशिवनी या नवनिर्मित नगरपंचायती आहेत. शेगाव नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्राकरितादेखील मतदान होत आहे. या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींबरोबरच पोटनिवडणूक होत असलेल्या संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
पोटनिवडणूक होत असलेल्या जागांचा नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय तपशील: जव्हार (जि. पालघर)- 6ब, पोलादपूर (जि. रायगड)- 16, राजापूर (जि. रत्नागिरी)- अध्यक्ष, पंढरपूर (जि. सोलापूर)- 10ब, वाई (जि. सातारा)- 5अ, मेढा (जि. सातारा)- 15, निफाड (जि. नाशिक)- 6, श्रीरामपूर (जि. अहमदनगर)- 12अ, नंदुरबार (जि. नंदुरबार)- 16अ, लोहारा बु. (जि. उस्मानाबाद)- 2, मोहाडी (जि. भंडारा)- 12 आणि शेगाव (जि. बुलडाणा)- हद्दवाढ क्षेत्र.  
निवडणूक कार्यक्रमाचा तपशील
·        नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 19 ते 25 जून 2018
·        नामनिर्देशनपत्रांची छाननी- 26 जून 2018
·        अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 02 जुलै 2018
·        अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- निकालाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत
·        मतदानाचा दिनांक- 15 जुलै 2018
·        मतमोजणीचा दिनांक- 16 जुलै 2018