Search This Blog

Thursday, July 20, 2017

शोधनिबंध पाठविण्याचे आवाहन


मुंबई विद्यापीठातील परिषदेसाठी
शोधनिबंध पाठविण्याचे आवाहन
मुंबई, दि. 20: भारतीय राज्य घटनेतील 73 व 74 व्या दुरूस्तीला 25 वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठात होणाऱ्या दोन दिवशीय राष्ट्रीय परिषदेसाठी 15 ऑगस्ट 2017 पर्यंत शोधनिबंध पाठवावेत, असे आवाहन मुंबई विद्यापीठ आणि पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
राज्य‍ निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने व राज्य शासनाच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठाचा राज्यशास्त्र विभाग आणि गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेतर्फे ही परिषद आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठात 14 ते 16 सप्टेंबर 2017 या कालावधीत ही दोन दिवशीय परिषद होईल. परिषदेचा मुख्य विषय ‘73 आणि 74 व्या घटना दुरूस्तीची 25 वर्षे: प्रगती आणि पुढील वाटचाल’ असा आहे. त्या अनुषंगाने भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे विकासाच्या दृष्टीने मार्गक्रमण, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात प्रश्न, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य‍ संस्थांच्या निवडणुकांची वैशिष्ट्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांचा सहभाग, प्रसारमाध्यमे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इत्यादी विषयांवर संशोधक आपले शोधनिबंध पाठवू शकतात. शोधनिबंध 8 हजार शब्दांपेक्षा जास्त मोठा नसावा. अधिक माहिती www.localdemocracy2017.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा