नांदेड- वाघाळा महानगरपालिकेची
प्रारूप मतदार यादी 19 ऑगस्टला
मुंबई, दि. 25: नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक
निवडणुकीसह बृहन्मुंबई, नागपूर, पुणे आणि कोल्हापूर महानगरपालिकेतील सहा रिक्त पदांच्या
पोटनिवडणुकांसाठी 19 ऑगस्ट 2017 रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या
जाणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले, की नांदेड- वाघाळा महानगरपालिकेची
मुदत 30 ऑक्टोबर 2017 रोजी संपत असल्याने निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यासाठी भारत
निवडणूक आयोगाने 1 जुलै 2017 रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरण्यात
येणार आहे. तिचे प्रभागनिहाय विभाजन करून 19 ऑगस्ट 2017 रोजी प्रारूप मतदार याद्या
प्रसिद्ध केल्या जातील. त्या दिवसापासून 28 ऑगस्ट 2017 पर्यंत या याद्यांवर हरकती व
सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार याद्या 7 सप्टेंबर 2017 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
त्याच दिवशी मतदान केंद्रांची यादी; तसेच प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्याही
प्रसिद्ध केल्या जातील.
रिक्तपदांसाठी मतदार याद्या
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 116, नागपूर
महानगरपालिका प्रभाग क्रमांक 35अ, कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्र. 11 व 77 आणि
पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 21अ व 39अ या जागा रिक्त आहेत. या सहापैकी तीन
जागा सदस्यांच्या निधनामुळे; तर तीन जागा संबंधित सदस्यांचे जातप्रमाणत्र अवैध ठरल्याने
रिक्त झाल्या आहेत. या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांच्या अनुषंगाने लेखनिकांच्या
चुका असल्यास, प्रभाग बदलला असल्यास किंवा विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही प्रभागनिहाय
मतदार यादीत नाव नसल्यास अशा चुकांबाबत कार्यवाही केली जाईल; तसेच मतदान केंद्राची
यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी संबंधित मतदान केंद्रांवरील सेवासुविधांची खात्री करण्याबाबत
सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रे तळमजल्यावर असावीत. अपवादात्मक स्थितीत पहिल्या
मजल्यावर असल्यास उद्वाहन (लिफ्ट) किंवा डोलीची व्यवस्था करावी. वीज, पिण्याचे पाणी,
प्रसाधनगृह, सावली, दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअर इ. सुविधादेखील उपलब्ध करून देण्याचे
आदेश दिले आहेत, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.