Search This Blog

Tuesday, October 17, 2023

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या वेळेत वाढ

 

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या वेळेत वाढ

मुंबई, दि. 17 (रानिआ): राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उर्वरित कालावधीत म्हणजे 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी 3 ऐवजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदांच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 05 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून 03 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आली होती. त्यानुसार नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. नामनिर्देशनपत्रासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणक प्रणालीद्वारे भरले जात होते, मात्र त्याची प्रिंट काढतांना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अडचणी आता दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या उर्वरित 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीतील मुदत सकाळी 11 ते दुपारी 3 ऐवजी आता सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 अशी करण्यात आली आहे. अन्य प्रक्रिया पूर्व घोषित कार्यक्रमाप्रमाणे पार पडेल. मतदान 05 नोव्हेंबर 2023 रोजी होईल.

Tuesday, October 3, 2023

2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान

 

2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान

3 हजार 80 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान

मुंबई, दि. 3 (रानिआ): राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 05 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.  

श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 ऑक्टोबर 2023 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. 05 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 06 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. मात्र गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे 07 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल.