Search This Blog

Sunday, December 18, 2022

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 74 टक्के मतदान

 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान 

मुंबई, दि. 18 (रानिआ): राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले. 
          राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या,  तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात 7 हजार 135  ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30  ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी 67 टक्के मतदान झाले होते. नक्षलग्रस्तभागात दुपारी 3.30 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी 20 डिसेंबर 2022 रोजी  मतमोजणी होईल.
        प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे - 35, पालघर - 62, रायगड - 191, रत्नागिरी - 163, सिंधुदुर्ग - 291, नाशिक - 188, धुळे - 118, जळगाव - 122, अहमदनगर - 195, नंदुरबार - 117, पुणे - 176, सोलापूर - 169, सातारा - 259, सांगली - 416, कोल्हापूर - 429, औरंगाबाद - 208, बीड - 671, नांदेड - 160, उस्मानाबाद- 165, परभणी - 119, जालना - 254, लातूर - 338, हिंगोली - 61, अमरावती - 252, अकोला - 265, यवतमाळ - 93, बुलडाणा - 261, वाशीम - 280, नागपूर - 234, वर्धा - 111, चंद्रपूर - 58, भंडारा - 304, गोंदिया - 345, गडचिरोली- 25. एकूण - 7,135.

Wednesday, November 30, 2022

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र ऑफलाईन सादर करण्याची मुभा

                                                     -राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई, दि. 1 (रानिआ): विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे; तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार दि.28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक (ऑफलाईन) पद्धतीने 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील.

Thursday, November 24, 2022

अचूक विधानसभा मतदार याद्या आवश्यक

महानगरपालिका, नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांकरिता 
अचूक विधानसभा मतदार याद्या आवश्यक

मुंबई, दि. 25 (रानिआ): विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांतील अपूर्ण आणि चुकीचे पत्ते व त्यात नोंदविलेल्या मतदारांच्या नावांमुळे महानगरपालिकांच्या प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यकतेनुसार इमारत, वस्ती, कॉलनी राहिवास क्षेत्राप्रमाणे पत्त्यामध्ये दुरूस्ती करण्याकरिता तातडीने मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान व मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी काल संबंधितास दिले.

विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांवरून प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासंदर्भात श्री. मदान यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. श्री. देशपांडे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यावेळी उपस्थित होते.

श्री. मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगातर्फे सध्या विधानसभा मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यांतर्गत 8 डिसेंबर 2022 पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे याच कालावधीत ही मोहीम राबवावी. एखाद्या मतदाराचा संपूर्ण पत्ता असूनही तो चुकीच्या सेक्शन ॲड्रेसमध्ये जोडण्यात आला असल्यास तो दुरूस्त करावा. शक्य असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार वेगळा सेक्शन ॲड्रेस तयार करावा.

श्री. देशपांडे म्हणाले की, या मोहीम काळात मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी प्रत्येक यादी भागाचा बारकाईने आढावा घ्यावा. विशेषत: नवीन इमारतींबाबत जास्त गोंधळ आढळून येतो. तो टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची मदत घेवून नवीन सेक्शन ॲड्रेस संकलित करून मतदार नोंदणी अधिकारी यांनी यादी भागात पत्त्यानुसार सेक्शन तयार करून त्या ठिकाणी राहणाऱ्या मतदारांची नावे नोंदविले जातील, याची दक्षता घ्यावी.

श्री. कुरुंदकर यांनी सांगितले की, सेक्शन ॲड्रेससंदर्भात शहरी भागातून मोठ्याप्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे. संबंधित महानगरपालिका आयुक्तांनी यात स्वत: लक्ष घालावे. काही नगरपालिका क्षेत्रातही अशा तक्रारी असतात. तेथेदेखील दक्षता घेण्यात यावी.