Search This Blog

Saturday, November 21, 2020

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबरला

         14,233 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबरला

मुंबई, दि. 21 (रानिआ): राज्यभरालीत 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 1 डिसेंबर 2020 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर 7 डिसेंबर 2020 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

श्री. मदान यांनी सांगितले की, एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या/ नवनिर्मित 1 हजार 566; तसेच जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधित मुदत संपणाऱ्या/ नवनिर्मित 12 हजार 667 अशा एकूण 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी या मतदार याद्या तयार केल्या जातील. यातील एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोवीडची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता; तर 19 नोव्हेंबर 2020 रोजी ही संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्द करण्यात आली. या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2020 पर्यंत अद्ययावत केलेल्या विधानसभेच्या मतदार याद्यांवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. विधानसभेच्या या मतदार याद्या 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित होत्या; परंतु भारत निवडणूक आयोगाने आता 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार याद्या 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केल्या आहेत. मतदार याद्यांत नाव नोंदविलेल्या सर्वांना मतदान करता यावे किंवा निवडणूक लढविता यावी, हे लोकशाहीचे मुलभूत तत्व आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमासह 5 फेब्रुवारी 2020 च्या आदेशान्वये तयार केलेल्या मतदार याद्यादेखील रद्द केल्या होत्या. आता निवडणूक प्रक्रिया रद्द झालेल्या ग्रामपंचायतींसह एकूण 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांचा हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

विधानसभा मतदारसंघाच्या 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येतील. त्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. या प्रारूप मतदार याद्यांवर तेंव्हापासून 7 डिसेंबर 2020 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात. हरकती व सूचनांसंदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, असेही श्री. मदान यांनी सांगितले.

Thursday, November 19, 2020

ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम रद्द

 ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम

नव्याने जाहीर होणार: मदान

यापूर्वी जाहीर केलेला कार्यक्रम रद्द

 

मुंबई, दि. 19 (रानिआ): राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोवीडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता रद्द करण्यात आला असून तो नव्याने जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

श्री. मदान यांनी सांगितले की, राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 फेब्रुवारी 2020 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविडची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. तत्पूर्वी 31 जानेवारी 2020 पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. विधानसभेची ही मतदार यादी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित होती; परंतु भारत निवडणूक आयोगाने आता 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार यादी 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे नव्याने मतदार यादीत नाव नोंदविलेल्यांना निवडणूक लढविता यावी किंवा मतदान करता यावे म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या 5 फेब्रुवारी 2020 च्या आदेशान्वये ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादीदेखील रद्द करण्यात आली आहे. परिणामी आता या निवडणुकांसाठी मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे.