Search This Blog

Tuesday, July 30, 2019

67 ग्रामपंचायतींसाठी 31 ऑगस्ट रोजी मतदान


 67 ग्रामपंचायतींसाठी
 31 ऑगस्ट रोजी मतदान
मुंबई, दि. 30 (रा.नि.आ.): राज्यातील विविध 14 जिल्ह्यांमधील 67 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर 2 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 31 ऑगस्ट 2019 रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. 1 ऑक्टोबर 2019 ते 13 डिसेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित अशा एकूण 67 ग्रामपंचायतींसाठी या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे 9 ते 16 ऑगस्ट 2019 या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 19 ऑगस्ट 2019 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 21 ऑगस्ट 2019 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 31 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 3 सप्टेंबर 2019 रोजी होईल.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 6, रायगड- 9, रत्नागिरी- 4, सिंधुदुर्ग- 3, नाशिक- 25, धुळे- 1, सातारा- 4, सोलापूर- 1, कोल्हापूर- 1, उस्मानाबाद- 3, अकोला- 2, यवतमाळ- 1, वर्धा- 5, आणि चंद्रपूर- 2. एकूण- 67.

चंदगड नगरपंचायतीसाठी 31 ऑगस्ट रोजी मतदान


चंदगड नगरपंचायतीसाठी
31 ऑगस्ट रोजी मतदान
मुंबई, दि. 30 (रानिआ): नवनिर्मित चंदगड (जि. कोल्हापूर) नगरपंचायतीच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 31 ऑगस्ट 2019 रोजी मतदान; तर 3 सप्टेंबर 2019 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, नामनिर्देशनपत्रे 3 ते 14 ऑगस्ट 2019 या कालावधीत दाखल करता येतील. 4, 10, 11 व 12 ऑगस्ट 2019 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 16 ऑगस्ट 2019 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 22 ऑगस्ट 2019 ही नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाच्या निकालाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे मागे घेता येतील. 31 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 3 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

Saturday, July 27, 2019

लोकसभा आणि विधानसभांमध्येही महिलांसाठी आरक्षण आवश्यक


मुंबई येथे शनिवारी राज्य निवडणूक आयोगातर्फे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते ‘लोकशाही पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यावेळी मा. उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया व राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांच्यासह पुरस्कार विजेते.

लोकसभा आणि विधानसभांमध्येही महिलांसाठी आरक्षण आवश्यक: उपराष्ट्रपती
मुंबई, दि. 27 (रानिआ): महिलांचा सन्मान करणे ही आपली परंपरा असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही महिलांसाठी आरक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज येथे केले.
 राज्य निवडणूक आयोगातर्फे प्रथमच देण्यात येणारे ‘लोकशाही पुरस्कार’ उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते आज मुंबई येथे प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे होते. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया आणि राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यावेळी उपस्थित होते. सन 2016 आणि 2017 या कालावधीत पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतल्याबद्दल विविध संस्था आणि व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांमध्ये एकूण 14 व्यक्ती व संस्थांचा समावेश आहे.
पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन आणि राज्य निवडणूक आयोगाच्या उपक्रमांचे कौतुक करून उपराष्ट्रपती म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राखीव जागा उपलब्ध झाल्यामुळे विविध स्तरातील महिलांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आता लोकसभा आणि विधानसभांमध्येही महिलांसाठी राखीव जागांची तरतूद करण्याची गरज आहे.
महाराष्ट्राला सामाजिक आणि राजकीय सुधारणांची मोठी परंपरा लाभली आहे. तीच परंपरा आता राज्य निवडणूक आयोग पुढे नेत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात येथे झालेल्या सुधारणांचे इतर राज्यांनीही अनुकरण करावे. आपण संघराज्य व्यवस्था स्वीकारली असून उल्लेखनीय कार्ये आणि ज्ञानाची आपसात देवाण- घेवाण झाली पाहिजे. त्यामाध्यमातून स्थानिक स्वराज्य्‍ा संस्था अधिक मजबूत होऊ शकतील. स्थानिक स्वराज्य संस्थांना चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. आता त्यांच्याकडे 73 व 74 व्या घटना दुरूस्तीनुसार सर्व विषय पूर्णत: सोपविले पाहिजेत, अशीही अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.
लोकशाही पुरस्कारांचा देशातील हा पहिला उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुलभता आणि एकसूत्रता आणण्यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या धर्तीवर एकच कायदा करण्यासंदर्भात मसुदा सादर केला आहे. त्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. राज्यात होणाऱ्या निवडणुकांसंदर्भात राज्य शासनाने समितीदेखील नियुक्त केली आहे. राज्यात कुठे ना कुठे सातत्याने आचारसंहिता लागू असते. त्याचा परिणाम एकूण प्रशासनावर आणि विकासावर होतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकादेखील एकाच वेळी घेण्यासंदर्भात विचारमंथन करण्याची आवश्यकता आहे.   
श्री. सहारिया यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिक चुरशीच्या आणि गुंतागुंतीच्या असतात. विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते. काही जणांकडून मात्र या निवडणुकांना दुय्यम स्थान दिले जाते; परंतु समाजातील विविध घटक स्वयंस्फूर्तीने पुढे येतात. त्यामुळे या निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडणे शक्य होते. त्यासाठीच विविध व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. तो आज प्रत्यक्षात आला आहे.
        पुरस्कार विजेत्या व्यक्ती व संस्थांची गटनिहाय नावे अशी: निवडणुकांमध्ये लोकसहभाग वाढविणे- माथेरान हॉटेल असोसिएशन, मुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ, महिंद्रा आणि महिंद्रा उद्योग समूह, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस्, मुंबई विद्यापीठ, मुंबई, रिसोर्स ॲण्ड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हल्पमेंट आणि श्री. संदीप भास्कर जाधव, सोलापूर. निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडणे- डॉ. अभिनव देशमुख, तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक, गडचिरोली, श्रीमती दया अर्जुन डोईफोडे, पोलिस हेड कॉन्सटेबल, कराड आणि श्री. केशव व्यंकटराव नेटके, तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी, पैठण नगरपरिषद. निवडणुकांसंदर्भात अभ्यास आणि प्रत्यक्ष संशोधनाद्वारे ज्ञाननिर्मिती- गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे. निवडणूक प्रक्रियेत संगणक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर- माहिती व तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन. निवडणुकांमध्ये मतदानाचे सर्वाधिक प्रमाण वाढविणे- बृहन्मुंबई महानगरपालिका. निवडणुका सुरळीत पार पाडणे, निवडणूक प्रक्रियेत संगणकाचा वापर करणे आणि मतदानाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ- श्री. ए. एस. आर. नायक, तत्कालीन जिल्हाधिकारी, गडचिरोली.

Friday, July 26, 2019

ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्यांची 29 जुलैला प्रसिद्धी


विविध जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींच्या
प्रारूप मतदार याद्यांची 29 जुलैला प्रसिद्धी
मुंबई, दि. 26 (रानिआ): विविध जिल्ह्यांतील 65 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर विविध ठिकाणच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 29 जुलै 2019 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, यात 1 ऑक्टोबर ते 13 डिसेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 48; तर नवनिर्मित 17 अशा एकूण 65 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसह रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी ही मतदार यादी तयार करण्यात येत आहे. विधानसभा मतदार संघाच्या 10 एप्रिल 2019 रोजी अस्तित्वात आलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्याआधारावर ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या 29 जुलै 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 29 ते 31 जुलै 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार याद्या 1 ऑगस्ट 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येतील.
०-०-०
(Jagdish More, PRO, SEC)

Wednesday, July 24, 2019

लोकशाही पुरस्कारांचे शनिवारी उपराष्ट्रपतींच्या हस्ते वितरण


लोकशाही पुरस्कारांचे शनिवारी
उपराष्ट्रपतींच्या हस्ते वितरण
मुंबई, दि. 24 (रानिआ): राज्य निवडणूक आयोगातर्फे प्रदान करण्यात येणारे पहिले ‘लोकशाही पुरस्कार’ जाहीर झाले असून उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचे शनिवारी (ता. 27 जुलै 2019) रोजी वितरण करण्यात येईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, मुंबईतील हॉटेल आयटीसी मराठामध्ये 27 जुलै रोजी सकाळी 10 वाजता पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सन 2016 आणि 2017 या कालावधीत पार पडलेल्या नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतल्याबद्दल विविध संस्था आणि व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी वेगवेगळ्या सहा गटात एकूण 14 पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
        गटनिहाय पुरस्कार विजेत्यांची नावे अशी: निवडणुकांमध्ये लोकसहभाग वाढविणे- माथेरान हॉटेल असोसिएशन, मुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ, महिंद्रा आणि महिंद्रा उद्योग समूह, असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस्, मुंबई विद्यापीठ, मुंबई, रिसोर्स ॲण्ड सपोट सेंटर फॉर डेव्हल्पमेंट आणि श्री. संदीप भास्कर जाधव, सोलापूर. निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडणे- डॉ. अभिनव देशमुख, तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक, गडचिरोली, श्रीमती दया अर्जुन डोईफोडे, पोलिस हेड कॉन्सटेबल, कराड आणि श्री. केशव व्यंकटराव नेटके, तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी, पैठण नगरपरिषद. निवडणुकांसंदर्भात अभ्यास आणि प्रत्यक्ष संशोधनाद्वारे ज्ञाननिर्मिती- गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, पुणे. निवडणूक प्रक्रियेत संगणक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर- माहिती व तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन. निवडणुकांमध्ये मतदानाचे सर्वाधिक प्रमाण वाढविणे- बृहन्मुंबई महानगरपालिका. निवडणुका सुरळीत पार पाडणे, निवडणूक प्रक्रियेत संगणकाचा वापर करणे आणि मतदानाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ- श्री. ए. एस. आर. नायक, तत्कालीन जिल्हाधिकारी, गडचिरोली.