Search This Blog

Wednesday, September 26, 2018

930 ग्रामपंचायतींसाठी 79 टक्के मतदान


930 ग्रामपंचायतींसाठी
79 टक्के मतदान
मुंबई, दि. 26 (रा.नि.आ.): राज्यातील विविध 26 जिल्ह्यांमधील 930 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सरासरी 79 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतींसाठी हे मतदान झाले. यात 930 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. मतदानाची वेळ सकाळी 7.30 पासून सायंकाळी 5.30 पर्यंत होती. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ होती. मतमोजणी उद्या (ता. 27) होईल.
मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 5, रायगड- 96, रत्नागिरी- 15, सिंधुदुर्ग- 3, नाशिक- 20, धुळे- 74, जळगाव- 5, अहमदगनर- 66, नंदुरबार- 54, पुणे- 47, सोलापूर- 59, सातारा- 32, सांगली- 1, कोल्हापूर- 15, बीड- 2, नांदेड- 12, उस्मानाबाद- 4, लातूर- 3, अकोला- 3, यवतमाळ- 3, बुलडाणा- 2, नागपूर- 373, वर्धा- 15, चंद्रपूर- 15, भंडारा- 2 आणि गडचिरोली- 4. एकूण- 930.

Tuesday, September 11, 2018

शिरोळ नगरपरिषदेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान


शिरोळ नगरपरिषदेसाठी
21 ऑक्टोबरला मतदान
मुंबई, दि. 11 (रा.नि.आ.): कोल्हापूर जिल्ह्यातील नवनिर्मित शिरोळ नगरपरिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर 2018 रोजी मतदान; तर 22 ऑक्टोबर 2018 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री. सहारिया यांनी सांगितले की, शिरोळ नगरपरिषदेच्या अध्यक्ष व 17 सदस्यपदांसाठी ही निवडणूक होत आहे. नामनिर्देनपत्रे 24 ते 29 सप्टेंबर 2018 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देनपत्रांची छाननी 1 ऑक्टोबर 2018 रोजी होईल. नामनिर्देनपत्रे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 21 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 22 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी दहा वाजता सुरू होईल.