Search This Blog

Saturday, November 15, 2025

रविवारीसुद्धा नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

 नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी रविवारीसुद्धा ऑफलाईन नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

 

मुंबई, दि. 15 (रानिआ): नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे ऑनलाईन; तसेच ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा उद्यादेखील (रविवारी, ता. 16) स्वीकारली जातील, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.  

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा नामनिर्देशनपत्र सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी (ता. 16) देखील सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. नामनिर्देशनपत्र व शपथपत्र  दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. अधिकाधिक इच्छूक उमेदवारांनी रविवारीच नामनिर्देशनपत्रे दाखल केल्यास अखेरच्या दिवशी ऐनवेळी होणारी धावपळ टळू शकेल, असेही राज्य निवडणूक आयोगाने आपल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

Friday, November 14, 2025

ऑफलाईनसुद्धा नामनिर्देशनपत्र

 नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांसाठी ऑफलाईनसुद्धा नामनिर्देशनपत्र भरण्याची सवलत

मुंबई, दि. 14 (रानिआ): नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवारांना ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा नामनिर्देशनपत्र सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी शनिवारी (ता. 15) आणि रविवारी (ता. 16) देखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

 राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे; परंतु विविध राजकीय पक्ष आणि इच्छूक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्रे सादर करण्याची सवलत देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्याबाबत क्षेत्रीय स्तरावर आढावा घेऊन ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा नामनिर्देशनपत्र भरण्याची सवलत देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. नामनिर्देशनपत्रे शनिवारी (ता. 15) आणि रविवारी (ता. 16) या दोन्ही सुट्टीच्या दिवशीसही सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्र व शपथपत्र  दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. 

Thursday, November 13, 2025

कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही

 नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही

शनिवारी (ता. 15)देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

मुंबई, दि. 13 (रानिआ): नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातीलच माहिती भरणे आवश्यक आहे. त्यासोबत कोणतेही कागदपत्रे सादर (अपलोड) करण्याची आवश्यकता नाही. संकेतस्थळावर संपूर्ण माहिती भरलेल्या नामनिर्देशनपत्राची आणि शपथपत्राची छापील प्रत (प्रिंटआऊट) घेवून व त्यावर सही करून आवश्यक कागदपत्रांसह तो संपूर्ण संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत जमा करणे आवश्यक आहे, असे स्पष्टिकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता नामनिर्देशपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे. परिपूर्ण माहिती भरल्यानंतर संकेतस्थळावरून त्याची मुद्रित प्रत (Print Out) काढून त्यावर उमेदवाराची स्वत:ची व सूचकांची स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्या मूळ प्रतीसह अन्य आवश्यक कागदपत्रांचा (उदा. नगरपरिषद/ नगरपंचायतीचे नादेय प्रमाणपत्र, शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्र, निवडणुकीसाठी बॅंक खात्याचा तपशील, राखीव जागांवरील उमेदवार असल्यास जातप्रमाणपत्र, पक्षाचा उमेदवार असल्यास जोडपत्र- 1 किंवा जोडपत्र- 2इत्यादी) संपूर्ण संच विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करणे बंधनकारक आहे.

इच्छूक उमेदवारांना नोंदणीसाठी सुरुवातीपासून सुरू केलेले संकेतस्थळ 17 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत 24 तास सुरू असेल. तोपर्यंत त्यावर इच्छूक उमेदवारांना कोणत्याही वेळी नोंदणी करता येते व नोंदणी करताना तयार केलेला लॉगीन आयडी व पासवर्ड आपल्याकडे जपून ठेवावा लागतो. कारण नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरण्यासाठी ते आवश्यक असते. सही केलेल्या प्रिंटआऊटसह आवश्यक त्या संपूर्ण कागदपत्रांचा संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला विहित मुदतीत म्हणजे 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांसह नामनिर्देशनपत्र शनिवारी, 15 नोव्हेंबर 2025 या सुटीच्या दिवशीसुद्धा स्वीकारण्यात यावेत, अशा सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र रविवारी (ता. 16) ते स्वीकारण्यात येणार नाहीत. इच्छूक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचेही निर्देश सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींना देण्यात आले आहेत, असे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.